समन्वयावर ठरणार विजयाचे गणित

समन्वयावर ठरणार विजयाचे गणित

मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधील राजकीय तिढा सुटला आहे. या मतदारसंघात आता काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपच्या उज्वल निकम यांच्यात लढत रंगणार आहे. असे असले तरी उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना-काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रसद एकमेकांना कशी पोहोचते, त्यावरही विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
उत्तर मध्य मुंबई हा तसा पारंपरिक कॉंग्रेसचा प्रभाव असणारा मतदारसंघ. या मतदारसंघात अल्पसंख्याक आणि दलित मतदारांचे प्राबल्य आहे. मात्र २०१४ मध्ये भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला. बदललेल्या राजकीय समीकरणाचा फायदा घेत हा मतदारसंघ पुन्हा जिंकण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत. या मतदारसंघाचे गेले दोन टर्म प्रतिनिधित्व करणाऱ्या पूनम महाजन यांचा मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला होता. त्यांच्याबद्दलची नाराजी बघता पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देणे टाळले आहे. भाजपने कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांना मैदानात उतरवले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व पक्षाचा दलित चेहरा असलेल्या वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
मतदारसंघात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ‘मातोश्री’चा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या पाठीशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा वर्षा गायकवाड यांनी उभी केली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे संयुक्त मेळावे शिवसेना आणि टिळक भवनात होत आहेत. त्यामुळे शिवसेना-काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय तयार झाला आहे. उमेदवारी मिळाल्यावर वर्षा गायकवाड यांनी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट हे बऱ्याच गोष्टी सांगून जाते. उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना-काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रसद एकमेकांना कशी पोहोचते, त्यावरही वर्षा गायकवाड यांच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
…...
अंतर्गत नाराजीचे आव्हान
मतदारसंघात मुस्लिम, दलित मते मोठ्या प्रमाणात असून ती कायम निर्णायक ठरली आहेत. यासोबत काही हिंदी भाषिक मतदार आपल्याकडे वळल्यास कॉंग्रेस या मतदारसंघात कमबॅक करू शकतो. मात्र कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी ही मोठी समस्या आहे. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात एकही मुस्लिम उमेदवार पक्षाने दिला नसल्याचा आरोप त्यांनी पक्षावर केला आहे. गायकवाड यांनी उमेदवारी मिळताच नसीम खान, भाई जगताप यांच्या भेटीगाठी घेत, नाराजीवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. नसीम खान यांची नाराजी दूर न झाल्यास मुस्लिम मतांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषक सांगतात.
…..
संविधान विरुद्ध हिंदुत्ववाद
उज्वल निकम हे मूळचे जळगावचे आहेत. त्यामुळे बाहेरील उमेदवार या आरोपावर त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. दुसरे म्हणजे त्यांनी सरकारी वकील म्हणून २६-११ चा खटला लढला होता. त्यात अजमल कसाबला फाशीची शिक्षा झाली होती. त्यामुळे निकम यांच्या उमेदवारीमुळे हिंदुत्ववाद, कसाब-बिर्याणी, दहशतवाद आणि पाकिस्तान-राष्ट्रवादाचे मुद्दे भाजपच्या प्रचारात ओघाने येणार आहेत. तसे संकेत भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी आधीच दिले आहेत. दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रवादाच्या मुद्द्याला तोंड न देता संविधान बचाव, विकास यावर प्रचार करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इथली लढाई संविधान विरुद्ध हिंदुतत्वाद अशीच रंगण्याची चिन्हे आहेत.

-----------------
२०१९ ची परिस्थिती
भाजपच्या पूनम महाजन यांनी ४ लाख ८६ हजार ६७२ मते मिळवित काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. प्रिया दत्त यांना ३ लाख ५६ हजार ६६७ मते मिळाली होती.
----------------
मतदारसंघातील रचना
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ आहेत. विलेपार्ले विधानसभा भाजपचे पराग अळवणी, त्याप्रमाणे चांदिवली येथे शिंदे गटाचे दिलीप लांडे, कुर्ला येथे शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर, कलिनामध्ये ठाकरे गटाचे संजय पोतनीस आमदार आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघात काँग्रेसचे झिशान सिद्दीकी, वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आमदार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com