साथीच्या आजारांविरोधात दोनहात

साथीच्या आजारांविरोधात दोनहात

साथीच्या आजारांविरोधात दोन हात
पालिकेचे नियोजन; मुंबईत कीटकनाशक व धूर फवारणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपला असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई शहर व उपनगरातील झोपडपट्टीसह नवीन इमारतीचे सुरू असलेले काम, मेट्रो व अन्य विकासकामे तसेच शहराच्या अन्य भागात कीटकनाशक व धूर फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणी अडगळीत पडलेले भंगार जप्त करण्यात येणार आहे.
पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून साथीच्या आजाराला लगाम घालण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या जातात. यावेळीही विशेष नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात कीटकनाशक व धूर फवारणी करण्यात येणार आहे. यासाठी खासगी संस्थांमार्फत विविध विभागात कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या शहरातील विविध भागात कीटकनाशक फवारणी सुरू झाली असून मच्छरांचे प्रमाण जास्त असलेल्‍या ठिकाणी धूर फवारणी करण्यात येत आहे. येथे १५ ते २० दिवस कीटकनाशक व धूर फवारणी केली जाणार आहे. रस्ते व गल्ल्यांलगतची गटारे, चेंबर यामध्ये प्राधान्याने फवारणी करण्यात येणार आहे.
शहरात ठिकठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन धूर व कीटकनाशक फवारणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय, मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणीही धूर व कीटकनाशक फवारणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात इमारतींचे सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन, भंगारात पडलेले सामान जप्त करण्यात येणार आहे. त्याशिवाय, पावसाळ्यात पाणी साठेल, अशा वस्तू उघड्यावर ठेवण्यात येऊ नयेत, असे आवाहनही करण्यात येणार आहे.

डेंगी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना
डेंगी रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंगी विषाणूंचा प्रसार करणाऱ्या एडीस इजिप्टाय डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली होती. या डासांची उत्पत्ती साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होत असल्याचे सर्वेक्षणातूनही उघड झाले आहे. त्यामुळे घराशेजारील परिसरातील टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, पाण्याचे पिंप, मनी प्लांट व बांबू आदी शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, कुंड्यांखालील ताटल्या ठेवण्यात येऊ नयेत, असे आवाहनही करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com