वाढत्या उष्णतेने पोटाचा संसर्ग

वाढत्या उष्णतेने पोटाचा संसर्ग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : सध्या धावपळीच्या आयुष्यात फास्ट फूड किंवा जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे पोटाच्या संसर्गाच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहे. सध्या दवाखान्यात अनेक रुग्ण पोटदुखीच्या तक्रारी घेऊन येत आहेत. गेल्या महिनाभरात पोटाच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या जवळपास ३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येत्या काळात अशीच उष्णतेत वाढ झाल्यास रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या महिनाभरापासून उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. या बदलत्या हवामानामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना सध्या पोटाच्या संसर्गाचा त्रास होत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात गॅस्ट्रोमुळे दररोज सरासरी ३१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. शहरातील सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही पोटाच्या संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
जेजे रुग्णालयातील मेडिसीन विभागाचे प्रमुख मधुकर गायकवाड यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये गॅस्ट्रोच्या सुमारे ३०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच जुलाब, उलट्या आणि डिहायड्रेशनने त्रस्त असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात आले. असे असले तरी दाखल करण्यात आलेला रुग्ण चार ते पाच दिवसांत बरा होत आहे. तसेच ओपीडीच्या आधारावर दोन दिवसांत काही रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
......
जंक फूड हे समस्यांचे मुख्य कारण
अनेक मुंबईकर फास्ट किंवा जंक फूड मोठ्या आवडीने खातात. मुंबईकर वडापाव, समोसा, चायनीज भेळ, पाणीपुरी, फळे कापून ते रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांकडून खातात; पण खाद्यपदार्थ किंवा पेये किती स्वच्छपणे बनवली जातात किंवा ते पदार्थ कोणत्या तेलामध्ये बनवले आहेत, याकडे त्यांचे लक्ष नसते. खाद्यपदार्थ झाकून ठेवले आहेत की नाही याकडेही त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे पोटाच्या संसर्गाच्या समस्या वाढत आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.
…….
गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. साधारणपणे ही समस्या ई-कोलाय विषाणूमुळे होते. या रुग्णांना आम्ही प्रतिजैविके देतो. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
- डॉ. भूषण पंडित, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट
.......

दूषित अन्नामुळे गॅस्ट्रो होतो. गॅस्ट्रोच्या संसर्गामुळे आतड्यात किंवा पोटात सूज येते. त्यामुळे बाहेरचे पाणी आणि अन्न टाळावे.
- डॉ. शुभम जैन, नायर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय
...…
एप्रिलमध्ये ९१६ जणांना गॅस्ट्रोची लागण
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ९१६ लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली होती, तर मार्चमध्ये हा आकडा ६३७ वर होता. आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुंबईत गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दूषित पाणी किंवा चुकीचा आहार. अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते.
......
चार महिन्यांत ७१ टक्क्यांनी वाढ
गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या दर महिन्याला वाढत आहे. जानेवारीच्या तुलनेत एप्रिलमध्ये गॅस्ट्रोचे ७१ टक्के अधिक रुग्ण आढळले आहेत. जानेवारीत ५३६ रुग्णांची नोंद झाली होती, तर एप्रिलमध्ये ९१६ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली होती.
....
गॅस्ट्रोच्या रुग्णांची आकडेवारी
जानेवारी ५३६
फेब्रुवारी ६१२
मार्च     ६३७
एप्रिल ९१६

...…
काय करायचे?
- वैयक्तिक स्वच्छता खूप महत्त्वाची आहे
- चांगले शिजवलेले अन्न खा, बाहेरचे अन्न टाळा
- उकळलेले आणि कोमट पाणी प्या
- अन्नपदार्थ चांगले झाकून ठेवा
......
काय करू नये
स्वत: उपचार करणे टाळावे
फास्ट फूड आणि जंक फूड खाणे टाळा
कापलेली फळे आणि बर्फ असलेल्या रसाचे सेवन करू नका.
शिळे अन्न खाऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com