सावधान! उष्णतेने मुंबईकरांची दैना

सावधान! उष्णतेने मुंबईकरांची दैना

सावधान! उष्णतेने मुंबईकरांची दैना
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या २०० पार; चार संशयितांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्यातील तापमानाचा पारा चढत आहे. महाराष्ट्रातील तापमान ३५ ते ४४ अंश सेल्सिअस आहे. या कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. दरम्यान, या उष्णतेमुळे लोकांचा मृत्यू होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील चार संशयितांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यामध्ये सोलापुरात एक, तर नागपुरात तीन प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, आरोग्य विभागाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. ५ मेपर्यंत राज्यात उष्माघाताच्या रुग्णांनी दोनशेचा टप्पा ओलांडल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे मे महिन्यापासूनच कडक उन्हाळा सुरू झाला आहे. राज्य सरकार तसेच महापालिकांनी इशारा जारी केला असून, त्यामध्ये नागरिकांना खबरदारीचे उपाय पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ पर्यंत एकूण २०२ उष्माघाताचे रुग्ण आढळले. त्यापैकी सर्वाधिक २३ नाशिक त्यानंतर चंद्रपूरमध्ये २१, धुळ्यात २०, गडचिरोली २०, सोलापूर १८, सिंधुदुर्ग १०; तर ठाण्यात ६ रुग्ण आढळून आले. मुंबई आणि वाशीममध्ये हिट स्ट्रोकची एकही घटना नोंदलेली नाही. दरम्यान, सोलापुरात एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी (ता. ९) नागपूरमध्ये एका ७० ते ७५ वर्षीय वृद्ध, ५५ व ४० वर्षीय व्यक्तीचे मृतदेह आढळून आले. हे मृत्यू संशयित उष्माघात म्हणून नोंदले जाण्याची शक्यता आहे.


गेल्या वर्षी ३,१९१ रुग्णांची नोंद
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मार्च ते ऑगस्ट २०२३ दरम्यान उष्माघाताची ३,१९१ प्रकरणे नोंदवली गेली, तर २२ मृत्यू नोंदविले गेले. रायगडमध्ये सर्वाधिक ४१२ घटनांची नोंद झाली आहे. त्यानंतर पुणे ४०९, नागपूर ३६२, वर्धा ३४०, चंद्रपूर १९८, लातूर १९०, ठाणे १५६ आणि मुंबईत १५५ उष्माघाताचे रुग्ण आढळून आले आहेत.

उष्माघाताचा धोका
जे. जे. रुग्णालयाचे डॉ. मधुकर गायकवाड यांनी उष्णतेच्या लाटेच्या मानवी शरीरावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत इशारा देत, उष्माघात आणि उष्माघाताचा धोका दर्शवला आहे. ते म्हणाले की, उष्माघातामुळे बदललेली मानसिक स्थिती, फेफरे आणि चेतना नष्ट होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात, ज्यासाठी त्वरित वैद्यकीय हस्तक्षेप आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com