श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचा वर्धापन दिन

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचा वर्धापन दिन

मुंबई : स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ मठाचा वर्धापन दिन नुकताच पार पडला. यानिमित्ताने ९ आणि १० मे रोजी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम पार पडले. त्या निमित्ताने स्वामी समर्थ महाराज पादुका पालखी सोहळा, होमहवन, मेडिकल कॅम्प यासह रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फळे व अन्न वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. असंख्य भाविक व मान्यवर नेते मंडळींनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. खासदार अरविंद सावंत, अजय चौधरी, आमदार प्रसाद लाड, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी आमदार दगडू सकपाळ, सुधीर साळवी, सचिन शिंदे, नाना अंबोले आदींनी हजेरी लावून मनोभावे दर्शन घेतले, अशी माहिती मठाचे विश्वस्त सचिन शेट्टी यांनी सांगितले.
.....
मुंबई : स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ मठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
…….

धारावीत संयुक्त जयंती महोत्सव
धारावी (बातमीदार) : धारावीतील मचिगार समाज सेवा संघातर्फे रविवारी (ता. १२) बसवेश्वर महाराज आणि संत हरळया यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने अशोक सिल्क मिल कंपाऊंड येथून उत्सव फेरीचे आयोजन करण्यात आले होते. काळा किल्ला, मुकुंद नगर, धारावी कोळीवाडा, दगडी बिल्डिंग, नवी चाळ, ९० फुटी रस्ता अशी फेरी फिरवण्यात आली. काळा किल्ला परिसरातील अशोक मिल्क कम्पाऊंड या ठिकाणी बसवेश्वर महाराज व संत हरळया यांचे देऊळ बांधले आहे. सालाबादप्रमाणे जयंतीनिमित्त भव्य-दिव्य बसवेश्वरची संत हरळया संयुक्त मिरवणूक काढण्यात येते, अशी माहिती रायप्पा पिटकेकर यांनी दिली.
……
सेवा व्यावसायिकांची ‘एआय’मुळे वेळेची बचत
मुंबई : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) वापरल्यामुळे आपला वेळ वाचतो, असे मत भारतातील एआय वापरणाऱ्या ९४ टक्के सेवा व्यावसायिकांनी व्यक्त केले. सेल्सफोर्सच्या अहवालात ही माहिती देण्यात आली असून त्यामध्ये त्यांनी परदेशातील व भारतातील साडेपाच हजार सेवा व्यावसायिकांची मते घेतली आहेत. यामुळे कार्यक्षमता वाढते, तसेच गुणवत्तेशी तडजोड न करता सेवा सुधारता येते, असेही या अहवालात म्हटले आहे. भारतातील ७३ टक्के सेवा संस्थांद्वारे एआयचा वापर होतो. यावर्षी देशातील ९३ टक्के सेवा संस्थांना यामध्ये गुंतवणूक करायची आहे. अहवाल बनवणे, सल्ला घेणे, माहितीपूर्ण लेखांची निर्मिती यासाठी एआय सर्वात जास्त वापरले जाते, असेदेखील हा अहवाल म्हणतो. ही माहिती सेल्स फोर्सच्या अरुण कुमार परमेश्वर यांनी दिली.
……
इंडियन हॉटेल, सीजी ग्रुपचे ‘ऐक्यम’द्वारे सहकार्य
मुंबई : इंडियन हॉटेल कंपनी लि.ने जंगल पर्यटन, साहस पर्यटन आदी निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सीजी कॉर्प ग्लोबल, तसेच सीजी हॉस्पिटॅलिटी यांच्याशी ऐक्यम उपक्रमाद्वारे सहकार्य करीत असल्याचे जाहीर केले. या उपक्रमात साहसी पर्यटनाबरोबरच पर्वत पर्यटन, महासागर आणि जलपर्यटन आदींवर भर देऊन त्यासाठी पर्यटकांना आकर्षित करतील अशा मोहिमा हाती घेऊन पर्यटकसंख्या वाढवली जाईल. सीजी हॉस्पिटॅलिटीचे एमडी राहुल चौधरी, आयएचसीएलचे एमडी व सीईओ पुनीत चटवाल, सीजी कॉर्प ग्लोबलचे अध्यक्ष विनोद चौधरी यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. २०२५ पर्यंत या संयुक्त उपक्रमात देश-विदेशातील २५ हॉटेल सहभागी होतील, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. आय.एच.सी.एल. व सीजी ग्रुप यांचे दोन दशके सहकार्य आहेच. मात्र आता या नव्या भागीदारीमुळे भारतीय उपखंडात जंगल पर्यटन, साहस पर्यटन आदी क्षेत्रे विकसित करण्यासाठी हॉटेल्स निर्मिती केली जाईल, असेही चटवाल म्हणाले.
……
कौशल्य विकास प्रबोधिनी विदेशी भाषा प्रशिक्षण
मुंबई : विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून विदेशी भाषा प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून मार्चमध्ये प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. परदेशातील उपलब्ध रोजगार आणि त्यासाठी आवश्यक भाषा कौशल्य युवकांना मिळावे यासाठी येथे जपानी, हिब्रू, जर्मन आणि फ्रेंच या चार भाषांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल. शनिवारी जर्मन भाषेच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरू झाले आहे, लवकरच जपानी भाषा प्रशिक्षणदेखील सुरू करण्यात येईल. सध्या जर्मनीमध्ये कुशल मनुष्यबळाच्या सात लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत, तर २०३५ पर्यंत त्यांना ७० लाख कुशल मनुष्यबळ लागेल. जपानमध्येही कुशल मनुष्यबळाची गरज आहे. या विदेशी भाषा प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकांमार्फत परदेशातील कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी सर्व पातळ्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याचप्रमाणे ही प्रबोधिनी, लोढा यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या महाराष्ट्र इंटरनॅशनल या रोजगार केंद्राशीदेखील जोडलेली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधींसह तेथे राहण्याची व्यवस्था, आवश्यक गोष्टींचे प्रशिक्षण, मुलाखतीचे प्रशिक्षण इत्यादी सुविधा मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com