पावसाळी आजारांनी वाढवला ताण

पावसाळी आजारांनी वाढवला ताण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : पावसाळा आता तोंडावर असल्याने महापालिका कामाला लागली आहे. एकीकडे वाढता उष्मा मुंबईकरांना हैराण करत असताना, दुसरीकडे शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये डेंगी आणि मलेरियाने थैमान घातले आहे. गेल्या आठवड्यात कीटकनाशक विभागाच्या तपासणीत २०९ ठिकाणी मलेरियाचा ॲनोफिलीस डास आढळून आला, तर डेंगीला कारणीभूत ठरणाऱ्या एडिसच्या डास १,६४४ ठिकाणी आढळून आले. ही ठिकाणे महापालिकेने उद्ध्वस्त केली आहेत. तसेच, डासांची उत्पत्तिस्थळे आढळलेल्या परिसरातील दीडशेहून अधिक नागरिकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.
महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. सध्या महापालिका आयुक्तांनी विविध संस्थांच्या परिसरातील पाण्याच्या टाक्यांमधील डास प्रतिबंधाची कारवाई १५ मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विभागीय पातळीवरील विविध यंत्रणांना सक्रिय सहभाग घेऊन डासांची उत्पत्ती होत असलेल्या ठिकाणी महापालिकेसह संयुक्त शोधमोहीम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कीटक नियंत्रण विभाग मुंबईतील डेंगी आणि मलेरियाच्या डासांची उत्पत्ती ठिकाणे शोधून नष्ट करत आहे. शहरात सुरू असलेल्या तपासणीत जवळपास ७० टक्के साथीच्या ठिकाणांची ओळख पटलेली आहे. विशेष म्हणजे हे डास झोपडपट्ट्यांमध्ये पाणी साठवण्यासाठी ठेवलेल्या ड्रममध्ये आढळतात. त्यामुळे, नागरिकांनी आठवड्यातून एकदा ड्रम रिकामे करून स्वच्छ करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
.....
पाच हजार जणांना नोटीस
जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत मुंबईत ३,१५२ ठिकाणी मलेरिया वाहतूक करणारे ॲनोफिलीस डास आढळून आले आहेत. आतापर्यंत एकूण ३,३६१ ठिकाणी ॲनोफिलीस आढळले आहेत. तसेच या कालावधीत ३२,०९२ ठिकाणी डेंगीचा एडिस डास आढळून आला. दरम्यान, साथीच्या आजाराला कारणीभूत असलेल्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. महापालिकेने जानेवारी ते मार्चपर्यंत पाच हजार २५२ नोटिसा बजावल्या आहेत.
.....
अशी काळजी घ्या
दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ यांसारखे आजार पसरतात. तसेच डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया यांसारखे आजार पसरतात, असे महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे पावसाळ्यातील हा आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घरे व परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच पाणी साचू देऊ नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com