मुंबईत धुळीच्या वादळासह मुसळधार पाऊस

मुंबईत धुळीच्या वादळासह मुसळधार पाऊस

मुंबईत धुळीच्या वादळासह मुसळधार पाऊस
होर्डिंग कोसळून चौघांचा मृत्यू; ६९ जण जखमी


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : धुळीच्या वादळासह कोसळलेल्या पावसाने मुंबईला आज झोडपून काढले. मान्सूनपूर्व पावसामुळे लोकांची दाणादाण उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वडाळ्यात मेटल पार्किंग लिफ्ट कोसळली. त्यात सात ते आठ जण जखमी झाले. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाला, तर ६९ जण गंभीर जखमी झाले आहेत. साधारणतः तासभर कोसळलेल्या पावसामुळे मुंबईमध्ये हाहाकार माजला होता. दरम्यान, या घटनांची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून मुंबईतील होर्डिंगचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्याचे तसेच विनापरवाना होर्डिंग काढून टाकण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मुंबईत सायंकाळी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसाआधी धुळीचे वादळ सुरू झाले. यामुळे संपूर्ण वातावरणात धुळीचे लोट उठल्याचे दिसले. यामुळे दृश्यमानताही कमी झाली होती. यानंतर पुढील पाच मिनिटांतच विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कुलाबा, दादर, परळ परिसरालाही पावसाने झोडपून काढले. भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, सायन, धारावी, कांजूरमार्ग येथे धुळीच्या वादळासह जोरदार पाऊस झाला. देवनार, चेंबूर, मानखुर्द यासह मुलुंड-भांडुपमध्ये धुळीच्या वादळासह जोरदार पाऊस झाला. यासह ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली परिसरालादेखील पावसाने झोडपून काढले. आजच्या वादळी पावसाबद्दल हवमान विभागाने चेतावणी जारी केली होती. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. यावेळी ५०-६० किमी प्रतितास वेगाने जोरदार वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस झाला. निर्जन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्लाही प्रादेशिक हवामान विभागाने दिला होता. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, आकाश अंशतः ढगाळ राहणार असून संध्याकाळी तसेच रात्री मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
....
घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळले
घाटकोपरच्या छेडानगर येथील १२० बाय १२० फुटांचे बेकायदा महाकाय होर्डिंग आज सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास जवळील पेट्रोलपंपावर कोसळले. या दुर्घटनेत पेट्रोलपंपावर गॅस भरण्यासाठी आलेल्या तीन रिक्षाचालकांच्या रिक्षांवर लोखंडी कमान कोसळल्याने या तिघांचा त्यात मृत्यू झाला. या घटनेत आणखी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. विविध सरकारी रुग्णालयांत उशिरापर्यंत ६९ जखमींना उपचारासाठी आणण्यात आले. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. होर्डिंगखाली अडकलेल्या १००पेक्षा जास्त नागरिकांना वाचवण्यात आले. हे बेकायदा महाकाय होर्डिंग रेल्वे हद्दीत असल्याने जीआरपी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. छेडानगर येथील होर्डिंग लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत बेकायदा उभे होते. या ठिकाणी नियमानुसार ४० बाय ४० फुटांचे होर्डिंग उभारण्याची परवानगी संबंधित कंपनीला पालिकेने दिली होती; मात्र याकडे संबंधित इगो मीडिया कंपनीने दुर्लक्ष करीत २२ एप्रिलपासून होर्डिंगसाठी बेकायदा बांधकाम सुरू केले होते. याबाबत आलेल्या तक्रारींनंतर पालिकेने लोहमार्ग आयुक्तालयाकडे तक्रारही दाखल केली होती. या दुर्घटनेमुळे पालिकेने रेल्वेसह संबंधित आस्थापनांना नोटीस बजावली असून एफआयआरही दाखल करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. लोहमार्ग आयुक्तांनी कोणत्या आधारावर परवानगी दिली, याची मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार आहे.
...
वडाळ्यात लोखंडी कार पार्किंग कोसळले
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वडाळा बरकत अली रोडवरील लोखंडी कार पार्किंग कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. हे कार पार्किंग नव्याने बांधलेल्या इमारतीच्या बाहेर उभारण्यात आले होते. ते अचानक रस्त्यावर कोसळल्याने मोठा हाहाकार उडाला. या लोखंडी अँगलखाली रस्त्यावर उभ्या असलेल्या सुमारे आठ ते दहा कार दबल्या गेल्या. एका कारमध्ये दोघे जण अडकून गंभीर जखमी झाले. मुंबई अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून त्यात अडकलेल्या दोघांची सुटका करून त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. लोखंडी अँगल रस्त्यावरच पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत लोखंडी अँगल हटवण्याचे काम सुरू होते.
...
जोगेश्वरीत रिक्षावर झाड पडल्याने चालक जखमी
जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी नाका येथे शिवसेना शाखा क्रमांक ७७ जवळील ऑटो रिक्षावर अवकाळी वारा आणि मुसळधार पावसामुळे नारळाचे झाड पडले. यात रिक्षाचालक हयात खान गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी रिक्षाचालक हयात खान यांना जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले.
...
आतापर्यंत बाहेर काढलेल्या लोकांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या तसेच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मृताच्या नातेवाइकांना पाच लाखांचे अनुदान देण्यात येईल, तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
...
घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत अनेक नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वयाने काम करीत असून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर केले. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी साहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
...
आजचा पाऊस....
शहर- दादर, रावळी कँप - १८ मिमी
पूर्व उपनगर - एस वॉर्ड ७८ मिमी, टी वॉर्ड - ६७, एल वॉर्ड - ४२ मिमी, एम पश्चिम - ३२ मिमी, विक्रोळी - ३१ मिमी, एम पूर्व - ३० मिमी
पश्चिम उपनगर - पी दक्षिण -४१ मिमी, के पूर्व ३६, के पश्चिम - ३८ मिमी
..........................
होर्डिंग प्रकरणातील जखमी
राजावाडी रुग्णालय - ६१ (४ मृत्यू)
एचबीटी रुग्णालय - ३
फुले रुग्णालय, विक्रोळी - ४
प्रकृती रुग्णालय, कळवा - १

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com