रक्तपेढ्या दात्यांच्या प्रतीक्षेत

रक्तपेढ्या दात्यांच्या प्रतीक्षेत

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबईसह राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. राज्यातील रक्तपेढ्यांकडे सध्या केवळ ३६,७०४ युनिट रक्त उपलब्ध आहे. हा साठा फक्त १० ते १२ दिवस पुरेल इतका आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील रक्तपेढ्यांमध्ये तीन-चार प्रकारच्या रक्तगटांचे रक्त उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करावी लागत आहे. रक्ताची वाढत गरज पूर्ण करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद प्रयत्नशील आहे.
राज्य रक्त संक्रमणाद्वारे चालवल्या जाणाऱ्या रक्तपेढ्या या रक्तदात्यांवर अवलंबून असतात. रक्तदान केल्यानेच रक्त मिळते, मात्र जननी सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर महिला, तुरुंगातील कैदी, बेवारस नागरिक, सिकलसेल, थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त बालके आदींना रक्तदात्याशिवाय रक्त देण्याची तरतूद आहे. सिकलसेल, थॅलेसेमिया, कर्करोगाच्या रुग्णांना नियमित रक्तदान करावे लागते. याशिवाय गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत रक्ताचा मोठा तुटवडा लक्षात घेता रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक महेंद्र केंद्रे म्हणाले की, सध्या राज्यातील ८२ हून अधिक रक्तपेढ्यांमधून एकूण ३६,७०४ युनिट रक्त जमा आहे. रक्तपेढ्यांकडून पॉझिटिव्ह रक्ताला सर्वाधिक मागणी असते आणि रक्तदात्यांना या गटाचे रक्त सहज मिळू शकते. त्या तुलनेत निगेटिव्ह रक्ताची मागणी कमी असते. तसेच त्याचा दाताही लवकर मिळत नाहीत. रक्तपेढीमध्ये निगेटिव्ह रक्त असणाऱ्यांची यादी असते. गरज पडेल तेव्हा त्यांची मदत घेतली जाते. ३५ दिवसांनंतर रक्त खराब होते, त्यामुळे रक्त कालबाह्य होण्यापूर्वी वापरण्याची जबाबदारी रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांवर असते.
…..
उपलब्ध नसलेले रक्तगट
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, रायगड, लातूर, नाशिक, सातारा, नगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही रक्तगटाचे रक्त उपलब्ध नाही. यामध्ये ओ निगेटिव्ह, एसडीपी, ए निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह, एबी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, आरडी, आरडीपी इत्यादी रक्तगटांच्या रक्ताचा समावेश आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे महेंद्र केंद्रे यांनी सांगितले.
….
अडीच महिन्यांत ११७ शिबिरे
महेंद्र केंद्रे म्हणाले, उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो. याचे मुख्य कारण म्हणजे सर्व शाळा, महाविद्यालये बंद असतात. एवढेच नाही तर रक्तदाते मुंबई आणि राज्याबाहेर जातात. त्यामुळे रक्ताच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. या टंचाईवर मात करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घेतली जात आहे. उन्हाळा संपताच रक्ताची कमतरता दूर होईल, असे ते म्हणाले.
...
उपलब्ध रक्ताचा साठा
मुंबई ७,६६१
पुणे ५,५४०
ठाणे २,५३३
कोल्हापूर २,२७२
सोलापूर २,०९१
नागपूर २,०७०
सांगली २,०६०
नाशिक १,९५३
सिंधुदुर्ग १,०२७
रायगड ९०५
लातूर ८८५
जळगाव ५३०
धुळे ५१८
अमरावती ५०९
जालना ४२९
नांदेड ३९४
रत्नागिरी ३७१,
बीड ३५,
वर्धा २९
अकोला २३९
बुलढाणा २०३
चंद्रपूर १९६
गडचिरोली १८८
धाराशिव १४१
वाशीम ११२
भंडारा १०५
पालघर १०२
नंदुरबार ९१
हिंगोली ८९
यवतमाळ ३८
परभणी २१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com