दिवसभराची रोजणदारी बुडाली

दिवसभराची रोजणदारी बुडाली

मुंबई, ता. १ : मुंबईतील रेल्वेच्या मेगाब्लॉकचा सर्वाधिक मोठा फटका, मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर परिसरातील बांधकाम आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना बसला. काही लोकल बंद, तर काही लोकल कमी झाल्याने बांधकाम आणि इतर क्षेत्रांतील कामगारांना कामावर पोहोचता आले नाही. त्यामुळे एका दिवसाचा रोजगार बुडाल्याची नाराजी कामगारांकडून व्यक्त करण्यात आली.
बोरा बाजारातील कामगार नाका, भायखळा आणि कुलाबा येथील नाक्यांवर उपनगरांतून मोठ्या संख्येने नाका कामगार दाखल होतात. मात्र, रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे शनिवारी अनेकांना जाण्यासाठी लोकलच मिळाल्या नसल्याने घरी परतावे लागले. मस्जिद, भायखळा आदी बाजारात दैनंदिन रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या कामगारांचीही मेगाब्लॉकमुळे गैरसोय झाली. मुंबईत फोर्ट परिसरातील बांधकाम आणि इतर कामांसंदर्भात दररोज सकाळी मानखुर्दहून लवकर पोहोचतो. मात्र, आज अनेकांना जाता आले नसल्याचे नाका कामगार प्रकाश आडे यांनी सांगितले; तर या गोंधळामुळे एक दिवसाचा रोजगार बुडाला, तो कसा भरून निघणार, असा सवाल शंकर चव्हाण यांनी केला. जे कामगार उशिरा पोहोचले त्यांची अर्धी हजेरी लागली तर काहींना तसेच परत घरी जावे लागल्याचे ‘ऑल इंडिया बंजारा सेवा संघा’चे पदाधिकारी अनिल राठोड यांनी सांगितले.
-------------------------------------------------
नाक्यांवर शुकशुकाट
मुंबईतील असंख्य वस्त्यांमधून बांधकाम कामगार ठरलेल्या नाक्यांवर कामांसाठी रोज येतात. यात कुर्ला स्टेशन येथे रंग कामगार, वरळी नाका, भायखळा, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, परळ आदी ठिकाणच्या नाक्यांवर बांधकाम,‍ सुतार, नळकामगार आदी, तर फोर्ट परिसरात असलेल्या अनेक नाक्यांवरही बांधकाम कामगार येत असतात. मात्र, आज मेगाब्लॉकमुळे अनेकांना कामावर पोहोचता आले नसल्याने नाक्यांवर शुकशुकाट होता.
---------------------------------------------------
सरकारी, अनुदानित आस्थापनांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना पर्यायी दिवस आणि घरी बसून काम करण्याची मुभा दिल्याने त्यांचे वेतन मिळणार आहे. मात्र, मुंबई तसेच ठाणे, नवी मुंबई, बदलापूर, पालघर येथून मुंबईत येणाऱ्या अनेकांचा एक दिवसाचा रोजगार बुडाल्याने त्यांची भरपाई सरकारने द्यावी.
- सुभाष तंवर, पदाधिकारी, भारतीय सेवा नाका कामगार संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com