बेस्टमधील गर्दी निवळली

बेस्टमधील गर्दी निवळली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाटाचे विस्तारीकरण आणि ठाणे रेल्वे स्थानकाची रुंदी वाढवण्याचे काम पूर्ण झाले. रविवारी दुपारी १.१० वाजता पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून टिटवाळ्यासाठी रवाना झाल्याने बेस्ट बसमधील गर्दी अखेर निवळली. आजपासून सर्व लोकल त्यांच्या नियमित वेळेनुसार धावणार असल्याने बेस्टवरील ताणही कमी होणार आहे.
रविवारी बेस्ट प्रशासनाने वडाळा, भायखळा आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकादरम्यान २२७ फेऱ्या चालवल्या. प्रत्येक फेरी मागे साधारणतः ५३ प्रवाशांनी प्रवास केला. दुपारी १२ वाजेपर्यंत १२,०६७ प्रवाशांनी प्रवास केला. दोन दिवसांच्या तुलनेत ही संख्या घटल्याचे दिसले. रेल्वे सुरळीत सुरू झाल्याने बेस्ट प्रशासनाने अतिरिक्त बस गाड्या चालवणे थांबवले आहे. १ जून रोजी रात्री ९.४५ वाजेपर्यंत बेस्ट परिवहनने वडाळा स्थानकातून १३२ फेऱ्या, भायखळा येथून १२५ फेऱ्या आणि सीएसएमटी येथून ९२ बसमधून प्रवाशांची वाहतूक केली. शुक्रवारी ३१ मे रोजी २८,६०,०६७ प्रवाशांनी बेस्ट बसमधून प्रवास केला आणि त्यांना १,९२,३५,७२९ रुपयांचे उत्पन्न मिळाले; तर १ जून रोजी २७,३७,९७६ प्रवाशांमुळे १,९९,७२,५८२ रुपयांचा महसूल बेस्टला मिळाला आहे.
------------------------------------------
मर्यादित वेळेत कामपूर्ण
ब्लॉकदरम्यान ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना या दरम्यान विविध अडचणींचा सामना करावा लागला; पण ठाणे फलाटाचे रुंदीकरण आणि फलाट १० आणि ११ चे विस्तारीकरणाचे क्लिष्ट आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्प अत्यंत मर्यादित वेळेत पूर्ण केल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com