अडीच तासाला एकाचा तंबाखूला रामराम

अडीच तासाला एकाचा तंबाखूला रामराम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार कोविड काळापासून मुंबईतील टाटा रुग्णालयात ‘तंबाखू क्विट’ अभियान सुरू करण्यात आले आहेत. या अभियानानिमित्त केलेल्या जनजागृतीतून गेल्या पाच वर्षांत वीस हजार लोकांनी तंबाखूचे सेवन सोडले आहे. तर तंबाखू सेवन करणाऱ्यांच्या एकूण आकडेवारीनुसार दर अडीच तासांनी एकाने तंबाखूला कायमचा रामराम केला आहे.
धूरविरहित तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी २,३०,००० हून अधिक भारतीयांचा मृत्यू होतो. तर जवळपास ९० टक्के तोंडाच्या कर्करोगाला तंबाखूचे सेवनच कारणीभूत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०१९ मध्ये देशात चार ठिकाणी ‘तंबाखू क्विट’ हे अभियान सुरू करण्यात आले होते. खारघरच्या टाटा रुग्णालयातील ॲक्ट्रेक सेंटरमध्ये हे अभियान सुरू करण्यात आले आहे. खारघर ॲक्ट्रॅक सेंटरचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांच्या देखरेखीखाली सुरू झालेल्या या मोहिमेत तंबाखूचे सेवन करणाऱ्यांचे समुपदेशन करून व्यसन सोडण्यासाठी त्यांना प्रबोधन केले जाते. पश्चिम विभागातील म्हणजे महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दमण-दीव येथील लोकांना तंबाखू सेवनापासून वाचवण्यासाठी सुरुवात करण्यात आली. तर इतर तीन क्विट लाइन दिल्ली, गुवाहाटी आणि बंगलोर येथून चालवले जात आहे.
-------------------------------------------------
दररोज हजाराहून अधिक कॉल्स
सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजी, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार १८००११२३५६ या क्विट लाईनवर दररोज एक हजाराहून अधिक कॉल येतात. दोन शिफ्टमध्ये १६ समुपदेशक तंबाखू सोडण्याचा सल्ला देण्यासाठी काम करतात.
------------------------------------------------
अशाप्रकारे होते समुपदेशन
धूम्रपान करणाऱ्या कोणालाही रुग्णालयात जाण्याची इच्छा नसते. अशा परिस्थितीत फोनचे माध्यम ही सवय सोडण्याच्या टिप्स मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. तंबाखूचे व्यसन हा आजार नसून मानसिकता असल्याचे क्विटलाईनचे प्रभारी आणि एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक डॉ. अतुल बुदुख यांनी सांगितले. तसेच ही सवय सोडण्यासाठी तुम्ही मित्र आणि कुटुंबीयांची मदत घेऊ शकता. महिला मिली (जाळलेला तंबाखू) वापरतात; पण ती आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे त्यांना वाटत नाही.
----------------------------------------------------
काय आहेत तोटे?
कर्करोग, फुप्फुसांचे आजार, हृदयविकार आणि पक्षाघात यासह अनेक आजारांसाठी तंबाखूचे सेवन हा एक प्रमुख जोखीम घटक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतातील मृत्यू आणि रोगाचे प्रमुख कारणांपैकी एक आहे. दरवर्षी अंदाजे १.३५ दशलक्ष मृत्यू होतात. भारत हा तंबाखूचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक देश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com