मुंबई दक्षिण मध्यमध्ये एकतर्फी लढत

मुंबई दक्षिण मध्यमध्ये एकतर्फी लढत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः मुंबई दक्षिण मध्यमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांच्यामध्ये लढत होती. शिवडी येथील गाडी अड्डा परिसरातील शिवडी वेअर हाऊसमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सर्वप्रथम टपाली मते मोजण्यात आली. एकूण ५,४३४ मतांपैकी राहुल शेवाळे यांनी १,९२६ मते घेत आघाडी घेतली. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये राहुल शेवाळे यांनी दहा हजारांची आघाडी घेतली; पण ही त्यांची शेवटची आघाडी ठरली. यानंतर मात्र तिसऱ्या फेरीपासून अनिल देसाई यांनी घेतलेली आघाडी सोडली नाही. देसाई यांची आघाडी तिसऱ्या फेरीनंतर वाढत गेल्याने मतमोजणी केंद्रावर शिवसैनिकांची गर्दी झाली. शिवसैनिकांनी रथ आणि ढोल-ताशा मागवून विजयी जल्लोष सुरू केला. दुपारी एकनंतर अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांचे आगमन होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, शिंदे गटाचे शिवसैनिक किंवा पराभूत उमेदवार राहुल शेवाळे मतमोजणी केंद्राकडे एकदाही फिरकले नाहीत.
-------------------------------------------
तिसऱ्या फेरीनंतर उलटफेर
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर नेमके काय होईल, याचा अंदाज येत नव्हता. यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर शुकशुकाट होता. केवळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावल्यामुळे पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. मात्र, तिसऱ्या फेरीपासून अनिल देसाई यांनी आघाडी घेतल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमू लागली. घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून गेला. गुलालाची उधळण सुरू झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com