३२ हजार रुग्णांना २६७ कोटींची मदत

३२ हजार रुग्णांना २६७ कोटींची मदत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’मधून फुप्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया तसेच अपघातामधील रुग्णांना आर्थिक मदत दिली जात आहे. त्यानुसार १३ महिन्यांत तब्बल ३२ हजारांहून अधिक रुग्णांना २६७ कोटी ५० लाखांची मदत मिळाली आहे.
आर्थिक मदत देण्यासाठी पाच प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यात हृदय शस्त्रक्रिया, फुप्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो व हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दोन लाखांपर्यंत मदत दिली जाणार आहे. गुडघा वा खुबा बदल शस्त्रक्रिया, मेंदू रोग, कर्करोग, लहान बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया आदींसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत केली जाईल; तर डायलिसिस, केमोथेरपी, जळीत रुग्ण, अस्थिबंधनसाठी ५० हजारांची मदत मिळेल. याशिवाय अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे २५ हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला. वरील निकषात बसणाऱ्या रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती नेमल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.
----------------------------------------
अर्जासाठी टोल फ्री क्रमांक
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये विविध आजारांचा समावेश करण्यात आल्यामुळे अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांसाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.
- दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने मुंबईत येण्याची गरज नाही. अर्जासाठी ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com