मुंबईत पावसाळ्यातील आजारांचा आलेख घसरला!

मुंबईत पावसाळ्यातील आजारांचा आलेख घसरला!

पावसाळी आजारांचा आलेख घसरला!
गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत यंदा निम्म्याहून कमी प्रकरणे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदा पावसाळ्यातील आजारांच्या आलेखात मोठी घसरण झाली आहे. मलेरियाच्या रुग्णांमध्ये ३१ टक्के, डेंग्यूच्या ७३ टक्के आणि लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये ७१ टक्के घट झाली आहे. याशिवाय इतर आजारांनी ग्रस्त लोकांची संख्याही कमी झाली आहे. पावसाळ्याचे आगमन होताच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टो यांसारख्या आजारांना बळी पडणाऱ्यांची संख्या वाढते, मात्र यंदा जूनमध्ये आजारांचा आलेख तितकासा वाढलेला नाही.
पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकांना डासांमुळे होणाऱ्या आजारांची लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. गतवर्षी जूनमध्ये मलेरियाचे ६३९, डेंग्यूचे ३५३ आणि चिकन गुनियाचे ८ रुग्ण आढळून आले होते, तर या वर्षी जून महिन्यात मलेरियाचे ४४३, डेंग्यूचे ९३ आणि चिकन गुनियाची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनमध्ये लेप्टोस्पायरोसिस हा आजार चतुर्भुज प्राण्यांच्या संक्रमित मलमूत्राच्या संपर्कात आल्याने होण्याचे प्रमाणही कमी आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ९७ रुग्ण आढळले होते; तर या वर्षी केवळ २८ जणांना या आजाराचे निदान झाले. जून महिन्यात स्वाईन फ्लूचे केवळ १० रुग्ण आढळून आले आहेत.

अन्नाची काळजी घ्या
मुंबईकरांनी आपल्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज आहे. या वर्षी जून महिन्यात पोटाशी संबंधित आजारांचे म्हणजे गॅस्ट्रोचे ७२२ आणि हिपॅटायटीसचे ९९ रुग्ण आढळले आहेत. वरील रोग दूषित अन्न आणि अर्धवट शिजवलेल्या अन्नामुळे होतात.

डेंग्यूवर विशेष लक्ष
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी या वर्षी एप्रिलपासूनच कारवाई सुरू करण्यात आली होती. जून महिन्यात १८ हजार ७०१ डेंग्यूच्या प्रसाराची ठिकाणे नष्‍ट करण्यात आली. मलेरियाचे रुग्ण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत, मात्र तरीही रुग्णांची संख्या थोडी जास्त आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी सातत्याने काम सुरू आहे. जून महिन्यात २ हजार ७९७ प्रजननस्थळे नष्ट झाली आहेत.

खासगी रुग्णालयात वाढती संख्या
पालिकेच्या रुग्णालयात डेंग्यू, ताप व मलेरियाचे रुग्ण कमी दिसून येत आहेत; पण खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढत आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप व विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या रुग्णालयात २ ते ३ मलेरियाचे, तर ३ ते ४ डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नागरिकांनी अन्नपदार्थ व पिण्याचे पाणी सेवन करताना काळजी घेणे फार गरजेचे आहे. वातावरणामध्ये बदल झाल्यास शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे रुग्णांमध्ये वाढ होते.
-  डॉ. उर्वी महेश्वरी,
आंतरराष्‍ट्रीय औषध तज्‍ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com