आपत्तीविरोधात पालिकेची रुग्णालये सज्ज

आपत्तीविरोधात पालिकेची रुग्णालये सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : भविष्यात मुंबईत आपत्ती उद्भवल्यास बाधित लोकांना रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार मिळावेत, तसेच मृतांचे वेळेवर शवविच्छेदन व्हावे आणि त्यांना आवश्यक ती मदत मिळावी, यासाठी मुंबई महापालिका स्वतंत्र वैद्यकीय आपत्कालीन यंत्रणा आखणार आहे.
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत १४ निष्पापांना जीव गमवावा लागला, तर जखमींची संख्या ८८ वर पोहोचली. अपघातात अडकलेल्या जखमींना शोधण्यासाठी कुटुंबीयांना राजावाडी, केईएम, सायन रुग्णालयात जावे लागले. रात्री शवविच्छेदन करण्याची सोय नसल्याने कुटुंबीयांना दुपारपर्यंत मृतदेहाची प्रतीक्षा करावी लागली. याआधीही एल्फिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरी, बॉम्बस्फोट आणि इतर मोठे अपघात झाले आहेत. अशा परिस्थितीत तातडीने काम करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्तींच्या वेळी तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय आपत्कालीन यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. या माध्यमातून पीडितांवर तातडीने उपचार करणे, वेळेवर शवविच्छेदन, पीडितांच्या माहितीसाठी कुटुंबीयांना रुग्णालयात जावे लागणार नाही, प्रमुख व उपनगरीय रुग्णालयात उपचाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत, मृतांची लवकर ओळख पटवणे आदी प्रमुख मुद्दे एका प्रणालीद्वारे संबोधित केले जाणार आहेत.
-----------------------------
अशी असेल यंत्रणा
- मोठ्या आपत्तींच्या काळात राजकारण्यांच्या रुग्णालयांना भेटीगाठी वाढतात. या नेत्यांसह त्यांच्या साथीदारांच्या गर्दीमुळे पीडितांच्या उपचारात बरेच अडथळे निर्माण होतात. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून नेत्यांच्या रुग्णालय भेटीचे नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे.
- रुग्णालयांतील सध्याच्या अधिष्ठाताशिवाय माजी अधिष्ठाताची मदत घेतली जाणार आहे. याद्वारे मोठ्या आपत्तीच्या काळात रुग्णालयात रुग्णांवर उपचार करताना येणाऱ्या अडचणींची माहिती मिळणार आहे.
- समस्यांव्यतिरिक्त, आपत्तीला तोंड देण्यासाठी रुग्णालयांमध्ये काय बदल करता येतील, याच्या सूचनाही अधिष्ठातांकडून घेतल्या जातील.
------------------------------------------------
रुग्णालयांमध्ये विशेष पथक
आपत्तीच्या काळात बाधित लोकांना मदत करण्यासाठी नायर, केईएम, सायन, कूपर इत्यादी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये विशेष पथके तैनात केली जाऊ शकतात. त्यासाठी परळ येथील महापालिकेच्या आपत्कालीन प्रशिक्षण केंद्रात टीमला प्रशिक्षण देता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com