शिखर बँक घोटाळ्याचा 
एसआयटी तपास करा!

शिखर बँक घोटाळ्याचा एसआयटी तपास करा!

Published on

शिखर  बँक घोटाळ्याचा
एसआयटी तपास करा!

तक्रारदाराची न्यायालयात धाव; अजित पवारांच्या अडचणींत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ :   शिखर  बँक  घोटाळ्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचिट मिळाली असून पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून मूळ तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांनी या घोटाळ्याचा विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास करण्यात यावा, या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.
राज्य सहकारी  बँक  (शिखर  बँक) २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना कर्ज दिले होते. ही सर्व कर्जे बुडीत निघाली होती.  बँकेचे संचालक असलेल्या अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. २५ हजार कोटी रुपयांच्या  शिखर  बँक  घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट सत्र न्यायालयात दाखल केला. या क्लोजर रिपोर्टमुळे अजित पवार यांना क्लीनचिट मिळाली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्यात यावा. तसेच, निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली त्यावर देखरेख ठेवण्यात यावी, अशी मागणी करून मूळ तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर, ॲड. माधवी अय्यपन यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी (ता. ५) न्या. अजय गडकरी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी घेण्यात आली. तेव्हा याचिकाकर्त्यांनी याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी खंडपीठाकडे वेळ मागितला. न्यायालयाने दोन आठवड्यांचा अवधी देत सुनावणी तहकूब केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.