आठ लाख विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये विसंगती

आठ लाख विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये विसंगती

Published on

आठ लाख विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये विसंगती
शालेय शिक्षणमंत्र्यांची कबुली

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची माहिती यू-डायस प्लस प्रणालीच्या माध्यमातून जोडण्यासाठी त्यांच्या आधार प्रमाण‍िकरण (आधार कार्ड क्रमांक पडताळणी) करण्याच्या प्रक्रियेत तब्बल आठ लाख सात हजार ८२५ विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड आणि त्याच्या क्रमाकांच्या माहितीमध्ये विसंगती, त्रुटी आढळल्या असल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. तसेच, राज्यात विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल तीन लाख ३४ हजार १८२ विद्यार्थी आधार कार्डविना असल्याची माहितीही त्यांनी या उत्तरात दिली.
विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाण‍ीकरणाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानसभा सदस्य विकास ठाकरे, संजय जगताप, अस्लम शेख आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात केसरकर यांनी आठ लाख सात हजार ८२५ विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या माहितीमध्ये विसंगती असून त्यातील त्रुटी, तफावत दूर करून आधार क्रमांक वैध करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली. राज्यात शिक्षण घेत असलेल्या दोन कोटी १२ लाख २८ हजार ६७६ विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीअंती दोन कोटी ८६ हजार ६७१ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक वैध ठरले, तर उर्वरित ११ लाख ४२ हजार पाच विद्यार्थ्यांपैकी तीन लाख ३४ हजार १८२ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नसल्याची माहितीही शिक्षण मंत्र्यांनी आपल्या उत्तरात दिली.
..
८१६ आधार संच उपलब्ध
ज्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांक पडताळणी झाली नाही, अशा विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर कोणत्याही योजनांपासून वंचित ठेवले जात नाही. विभागामार्फत प्रत्येक गट साधन केंद्रावर दोन असे एकूण ८१६ आधार संच उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या उत्तरात दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.