

तरुणांच्या गुणवत्तेवर माझा पूर्ण विश्वास
फिनटेक महोत्सवात नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
मुंबई, ता. ३० : भारताची फिनटेक यंत्रणा देशाला गुणवत्तापूर्ण लाइफस्टाइल देईलच, पण दुनियेची जगण्यातील सहजता (इज ऑफ लिव्हिंग)देखील वाढवेल. तरुणांच्या गुणवत्तेवर माझा पूर्ण विश्वास असून बेस्ट इज यट टू कम, असा विश्वास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक फिनटेक महोत्सवात व्यक्त केला.
पूर्वी भारताची सांस्कृतिक विविधता पाहून थक्क होणारे परदेशी लोक आता भारतातील फिनटेक कंपन्यांचे वैविध्य पाहून थक्क होत आहेत. या महोत्सवातही तरुणांच्या नवकल्पनांनी उभारलेले नवे जग दिसत आहे. स्वस्त इंटरनेट, स्वस्त मोबाईल आणि झिरो बॅलन्स जनधन खाती यामुळे आज देशात सर्वत्र परिवर्तन झाले आहे. १० वर्षांत जनधन बँक खात्यांनी ५३ कोटी, म्हणजेच संपूर्ण युरोपच्या लोकसंख्ये एवढ्या भारतीय नागरिकांना बँक यंत्रणेत जोडले आहे. जनधन योजना, आधार आणि स्वस्त मोबाईल यामुळे भारतात क्रांती झाली असून आज जगातील डिजिटल व्यवहारांपैकी अर्धे भारतात होतात. भारताची यूपीआय पेमेंट यंत्रणा हे जगासाठी फिनटेकचे मोठे उदाहरण झाले आहे. जनधन योजनेने २९ कोटी महिलांचे बँकखाते उघडले असून महिला सक्षमीकरणाचे ते मोठे साधन झाले आहे. यातील मुद्रा कर्जाद्वारे २७ लाख कोटी रुपये कर्ज दिले आहे. जनधन योजनेने महिला आर्थिक सक्षमीकरणाची पायाभरणी केली आहे, असे पंतप्रधानांनी दाखवून दिले.
फिनटेक क्रांतीमुळे सरकारी व्यवहारात पारदर्शकता आली आहे. गावे आणि शहरे यांच्यातील दरी बुजवण्यास मदत होऊन मोठा सामाजिक परिणाम झाला आहे. तसेच अर्थसेवांचे सार्वत्रिकीकरण झाले असून विमा, कर्ज, क्रेडिट कार्ड, गुंतवणूक या बाबी सर्वांसाठी सोप्या झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन वैद्यकीय सल्ले या बाबी फिनटेकखेरीज अशक्य असून यामुळे भारतीयांचे राहणीमान सुधारले आहे, असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले. ह्या फिनटेक कंपन्या लोकल आहेत, पण त्यांचा वापर ग्लोबल आहे. भारताची ही उत्पादने अन्य देशांनाही उपयुक्त आहेत, अशा शब्दात मोदी यांनी त्यांचे कौतुक केले.
............
मी पुन्हा येईन
या महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून दहाव्या महोत्सवातही मी येथे येईन, असे मोदी यांनी सांगताच सभागृहात एकच हास्यस्फोट झाला. त्यावर्षी तुम्ही सर्वजण, तुम्हाला कल्पनाही येणार नाही अशा ठिकाणी पोहोचले असाल. फिनटेक क्षेत्राच्या विकासाबरोबरच भारतात मोठा बदल, मोठी क्रांती होत असून त्याची पायाभरणी या महोत्सवात पाहायला मिळत आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
..........
मोदी म्हणाले
एआयच्या सुयोग्य वापरासाठी जागतिक नियम आवश्यक.
फिनटेकसाठी सर्व धोरणात्मक बदल होत आहेत.
डेटा प्रोटेक्शन कायदा केला आहे.
सायबर फसवणुकविरोधी आणि डिजिटल साक्षरतेसाठी प्रयत्न जरुरी.
पर्यावरणपूरक आर्थिक वाढ हे आपले प्राधान्य आहे.
आर्थिक बाजारपेठेसाठी नियामक जाळे मजबूत हवे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.