

निर्देशांकांची मोठी घसरण
सेन्सेक्स १,७६९ अंश घसरला;
अकरा लाख कोटींनी मूल्य घसरले
मुंबई, ता. ३ : देशी आणि परदेशी गंभीर कारणांच्या एकत्रित परिणामामुळे आज भारतीय शेअर बाजारांमध्ये घबराट पसरून मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्यामुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांक दोन टक्क्यांपेक्षाही जास्त घसरले. आज सेन्सेक्स १,७६९.१९ अंश तर निफ्टी ५४६.८० घसरला.
आज सेन्सेक्सची सुरुवात चांगली झाली होती, सेन्सेक्सचे व्यवहार त्र्याऐंशी हजारांच्या वर सुरू झाले आणि नंतर त्याने ८३,७५२चा टप्पाही गाठला होता; मात्र तेथून मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा आला आणि निर्देशांक घसरले. दिवसअखेर सेन्सेक्स ८२,४९७.१० अंशावर तर निफ्टी २५,२५०.१० अंशावर स्थिरावला. आजच्या घसरणीमुळे शेअर बाजारातील सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य अकरा लाख कोटी रुपयांनी घसरले. काल हे मूल्य ४७५ लाख कोटी रुपये होते, तर आज ते घसरून ४६५.२५ लाख कोटी रुपये एवढे झाले.
आखातात इराण आणि इस्राईल यांच्यात युद्ध भडकण्याच्या शक्यतेमुळे कालपासूनच सर्वत्र भीतीचे वातावरण होते. या कारणामुळे कच्च्या तेलाचे भावही उसळल्यामुळे या भीतीत आणखी भर पडली. त्यातच सेबीने एफ ॲण्ड ओ क्षेत्रात नवीन नियम केल्यामुळे उलाढाल घटण्याची भीती निर्माण झाली. तर, चिनी अर्थव्यवस्थेला मिळालेल्या बुस्टर डोसमुळे तेथील शेअर बाजाराचे मूल्यांकन आकर्षक झाल्यामुळे परदेशी वित्तसंस्थांचा पैसा तेथे जाईल, अशी शक्यताही निर्माण झाली. या सर्व कारणांमुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठा विक्रीचा मारा आला आणि निर्देशांकांची घसरगुंडी उडाली, असे जिओजित फायनान्शिअल सर्विसेसचे विनोद नायर यांनी सांगितले.
आखातात युद्ध वाढण्याची भीती तसेच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर चलनवाढ होण्याची भीती, सेबीच्या नव्या नियमांमुळे व्यवहारांची उलाढाल कमी होण्याची भीती, तर परदेशी गुंतवणूकदारांचा पैसा चीनमध्ये जाईल ही शक्यता, यामुळे आज शेअर बाजारात निराशेचे वातावरण होते. आज १,०७७ शेअरचे भाव वाढले तर २,६३७ शेअरचे भाव कमी झाले आणि ८६ शेअरचे भाव कालच्याइतकेच राहिले. आज शेअर बाजारातील सर्वच्या सर्व तेरा क्षेत्रे तोटा दाखवत होती.
.........
परदेशी गुंतवणूकदारांचा पैसा भारतातून चीनमध्ये जाण्याच्या भीतीमुळेही आज निराशा होती. त्यामुळे शेअर बाजारात येते काही दिवस चढ-उतार राहतील; मात्र निकालांचा हंगाम सुरू होत असल्यामुळे काही विशिष्ट शेअरमध्येही चमक दिसू शकते.
-सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.