भांडुपमध्ये पायाभूत सुविधांची वानवा!

भांडुपमध्ये पायाभूत सुविधांची वानवा!
Published on

भांडुपमध्ये पायाभूत सुविधांची वानवा!
निवडणुकांमध्ये भावनिक मुद्द्यांचा वापर; वाहतूक कोंडीचा प्रश्‍न वर्षानुवर्षे जैसे थेच
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मराठी त्यातही तळ कोकणाशी नाते सांगणाऱ्या चाकरमान्यांचा कायम वरचष्मा राहिलेल्या भांडुप पश्चिम मतदारसंघात पायाभूत सुविधांची वानवा आहे. अनेक लोकोपयोगी, शासकीय प्रकल्प निधी मंजूर होऊनही अद्याप सुरू झालेले नाहीत. इथली प्रत्येक निवडणूक प्राधान्याने भावनिक मुद्द्यांवर लढली जाते. निवडून येणारा लोकप्रतिनिधी फक्त लादीकरण, काँक्रीटचे रस्ते, शेड, चौक सुशोभीकरण ही वरवरची कामे करून पायुभूत सुविधांच्या नावाखाली मतदारांच्या तोंडाला पाने पुसतो.

भौगोलिक, सामाजिक रचना
शीव ते मुलुंड या पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ विखुरला आहे. कधीकाळी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातला भांडुप हा महत्त्वाचा भाग होता. एपीआय, जीकेडब्ल्यू अशा बड्या कारखान्यांसोबत लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा लहान मोठ्या औद्योगिक वसाहती होत्या. विशेष म्हणजे मुंबईच्या औद्योगिक वसाहतींमध्ये राबणारा कुशल-अकुशल कामगार बहुतांशी भांडुपमध्ये स्थायिक होत होता. त्यामुळे श्रमिकांची, हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांची वस्ती अशी भांडुपची ओळख होती. दोनेक दशकांपूर्वी येथे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या इमारती होत्या.
सुमारे ९९ टक्के लोकसंख्या डोंगरउतार, सखल भागातल्या बैठ्या चाळी, झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करत होती. उद्योग बंद होताच त्या जागेत टोलेजंग रहिवासी प्रकल्प उभे राहिले. झोपू प्रकल्पांच्या माध्यमातून येथे इमारतींची संख्या वाढली. त्यामुळे अतिरिक्त लोकसंख्येचा भारही वाढला. त्या प्रमाणात पायुभूत सुविधा मात्र मर्यादित राहिल्या.

भाषिक रचना
भांडुप विधानसभा मतदारसंघात सुमारे ६० ते ७० टक्के मतदार मराठी भाषिक आहेत. त्या खालोखाल उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, मुसलमान, गुजराती, शीख समुदायाची मते आहेत.

मुख्य समस्या
अरुंद रस्ते, चिंचोळ्या वाटा
भांडुपमधून एलबीएस मार्गाला जोडणारा प्रत्येक रस्ता अरुंद आहे. सखल भागातल्या महाराष्ट्र नगर, कोकण नगर, भट्टी पाडा, गाढव नाका येथून डोंगरात वसलेल्या टेंभी पाडा, हनुमान नगर, रमाबाई नगर, खिंडी पाडा आदी दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये जाणारे प्रमुख रस्ते अरुंद आहेत. मोठी वाहने समोरासमोर उभी टाकल्यास येथे सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याशिवाय अनेक भागांमधून आजही पायवाटेनेच ये-जा करावी लागते. त्यामुळे आग लागल्यास, गंभीर गुन्हा घडल्यास किंवा वैद्यकीय आणीबाणी असल्यास अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका, पोलिस वाहने नेमक्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत.

मुलांनी खेळायचे कुठे?
दाट लोकवस्ती असूनही भांडुप पश्चिमेला मुलुंड, विक्रोळीप्रमाणे क्रीडांगण नाही. मधुबनसारखी क्रीडांगणे महापालिकेने धार्मिक, शैक्षणिक संस्थांना भाडेतत्त्वावर दिली आणि जिथे क्रीडांगणांचे आरक्षण आहे, ते भूखंड जसेच्या तसे पडून आहेत. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे, हा प्रश्र्न इथल्या राजकारण्यांना कधीच पडलेला नाही.

शासकीय रुग्णालय नाही
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक उपनगरात महापालिकेचे सुसज्ज रुग्णालय आहे. भांडुप पश्चिम उपनगर मात्र त्यास अपवाद ठरते.

नाले रुंदीकरण कागदावरच
भांडुपमध्ये मोठी लोकवस्ती सखल भागात राहते. त्यामुळे भरतीत पडलेल्या प्रत्येक मोठ्या पावसात या सखल भागात पाणी साठते. २६ जुलैच्या पुरानंतर येथे ब्रिमस्टो व्हॅड प्रकल्पाअंतर्गत नाले रुंदीकरण मंजूर झाले होते, मात्र अद्याप हा प्रकल्प कागदावरच असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करतात.

पूर्व-पश्चिम जोडणी नाही
भांडुप पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी मुलुंड किंवा विक्रोळीला वळसा घालावा लागतो.

नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्र नाही
भांडुपमध्ये कला, क्रीडा जपणूक असली तरी कलागुणांना वाव देणारे नाट्यगृह किंवा सांस्कृतिक कला केंद्र नाही.

याआधीच्या निवडणुकांवर दृष्टिक्षेप
२००९
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मराठमोळ्या भांडुपमधून मनसेचे शिशिर शिंदे यांनी ६८,३०२ मते मिळवत महायुतीचे सुनील राऊत (३४,४६७), महाआघाडीचे शिवाजीराव नलावडे (३७,३५९) यांचा पराभव केला होता.

२०१४
सर्व पक्ष स्वतंत्र लढले. महापालिकेतील भाजपचे तत्कालीन गटनेते मनोज कोटक भांडुपमधून लढले. अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार अशोक पाटील यांनी ४८१५१ मते घेत बाजी मारली. भांडुपसाठी नवखे असेलेल्या कोटक यांना ४३३७९, तर मनसेच्या शिशिर यांना ३६१८३ मते पडली.

२०१९
सेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली. त्यात युतीचे अर्थात शिवसेनेचे रमेश कोरगावकर विजयी झाले. त्यांना ७१,९५५ मते मिळाली. कोरगावकर सध्या सेनेच्या उद्धव ठाकरे गटात आहेत, तर मनसेचे संदीप जळगावकर ४२७८२ मते घेत दुसऱ्या स्थानी राहिले. आघाडीचे सुरेश कोपरकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com