भाजपसाठी मुलुंडची सहजसोपी लढत
भाजपसाठी मुलुंडची सहजसोपी लढत
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः मुलुंड या पारंपरिक मतदारसंघात प्रतिस्पर्धी पक्षांनी तुल्यबळ उमेदवार न दिल्याने यंदाची विधानसभा निवडणूक भाजपसाठी सहज सोपी ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना नकोशा झालेल्या पाच मतदारसंघांमध्ये मुलुंडचा समावेश आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा तब्बल ५८ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. भाजपने पुन्हा त्यांनाच संधी दिली आहे. गेल्या लढतीत मनसेने दुसऱ्या क्रमांकाची मते (३० हजार) घेतली होती. या मतदारसंघात ४५ टक्के मराठी भाषिक असूनही यंदा मनसेने येथून उमेदवार दिलेला नाही.
या मतदारसंघातून काँग्रेसच्या अलका देसाई, चरणसिंग सप्रा, महादेव शेलार, गोविंद सिंह निवडणूक लढले. यापैकी देसाई सोडल्यास एकालाही ४० हजार मतांचा टप्पा ओलांडता आला नाही. २००४ मध्ये देसाई यांनी ७० हजार मते घेतली होती. यंदाच्या राजकीय समीकरणांमध्ये येथून निवडणूक लढण्यास महविकास आघाडीतील एकाही पक्षाला रस नव्हता. सप्रा यांना सायन कोळीवाड्यातून लढण्याची इच्छा होती. काँग्रेसने नकार देताच शिवसेना ठाकरे गटाने येथून लढण्यास होकार दर्शविला, मात्र अखेरीस ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गळ्यात बांधण्यात आली. येथून तालुकाध्यक्ष संगीता वाजे यांना राष्ट्रवादीने रिंगणात उतरवले आहे, मात्र राजकीय पटलावर वैक्यक्तिक छाप नसलेल्या वाजे यांना मित्रपक्षांच्या विशेषतः शिवसेना ठाकरे गटाच्या साथीने भाजपला टक्कर द्यावी लागेल.
भाषिक समीकरण
मुलुंडमध्ये मराठी भाषिक ४५, गुजराती १९, हिंदी १२, दाक्षिणात्य ६, उर्दू २ आणि इतर भाषिक २० टक्के आहेत.
समस्या
प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन
महापालिकेतर्फे शहरात राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन मुलुंड पूर्वेकडे केले जाणार आहे. त्यातच मुलुंड पूर्वेकडील मिठागरे, कांदळवनांच्या जागेवर धारावीकरांचे पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. त्यास मुलुंडकरांचा प्रखर विरोध आहे. मुलुंडमध्ये आधीच पायाभूत सुविधा तोकड्या पडत आहेत. त्यात लाखभर वस्ती वाढल्यास सुविधांचा बोजवारा उडू शकेल, अशी येथील नागरिकांची धारणा आहे.
पेट्रोलपंप
मुलुंड पूर्वेला एकही पेट्रोलपंप नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पेट्रोल भरण्यासाठी पश्चिमेकडे यावे लागते किंवा ठाण्यात जावे लागते.
पार्किंग
लोकसंख्येच्या मानाने येथे पार्किंगची सुविधा उभी राहू शकलेली नाही. बंद पडलेल्या जकात नाक्याचा सुमारे १८ एकर जमिनीवर भव्य पार्किंग तळ उभारावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. याशिवाय बंद पडलेल्या क्षेपणभूमीच्या सुमारे ४२ एकर जागेवर एम्सप्रमाणे रुग्णालय, कला क्रीडा केंद्र, एसटी आगार, बेस्ट आगार किंवा सुरक्षा यंत्रणांसाठी सुसज्ज तळ उभारणे शक्य आहे. त्यासाठी येथील हरीओम नगरवासीयांनी सह्यांची मोहीम आरंभली आहे.
लोकसभा लढतीतले चित्र
महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांना मुलुंडमधून एक लाख १६ हजार ४२१, तर महाविकस आघाडीचे संजय पाटील यांना ५५ हजार ९७९ मते पडली होती.
मागील विधानसभा लढत
२०१९ मध्ये महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांना पहिल्या कमांकाची ८७ हजार २५३, तर मनसेच्या उमेदवार हर्षला चव्हाण यांना दुसऱ्या क्रमांकाची २९ हजार ९०५ मते पडली होती. सुमारे ५८ हजार मतांच्या फरकाने कोटेचा विजयी झाले होते. २०१४ मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढले. त्यात भाजपाचे सरदार तारासिंग तब्बल ६५ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यांनी ९३ हजार ८५०, काँग्रेसचे चरणसिंग सप्रा २८ हजार ५४३, शिवसेनेचे प्रभाकर शिंदे २६ हजार २५९, मनसेचे सत्यवान दळवी १३ हजार ४३२ तर राष्ट्रवादीचे नंदकुमार वैती यांनी चार हजार ८८० मते घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.