

४० कोटी विद्यार्थ्यांना तापमानवाढीचा फटका
युनिसेफच्या ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड’स चिल्ड्रेन अहवालातील माहिती
मुंबई, ता. ३ : हवामान बदल आणि पर्यावरणीय संकटांचा बालकांच्या शिक्षणावर गहन परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे शाळा बंद होऊ शकतात किंवा बालकांच्या शिक्षण आणि विकासाच्या संधीला बाधा येत असल्याची बाब समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर २०२२ पासून जगभरातील ४० कोटी विद्यार्थ्यांच्या शाळा तापमानवाढीमुळे बंद झाल्याची माहिती महाराष्ट्र ‘युनिसेफ’चे प्रमुख संजय सिंग यांनी दिली.
युनिसेफच्या ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड’स चिल्ड्रेन २०२४ या अहवालाचे सोमवारी (ता. २) मुंबईत प्रकाशन झाले, त्यात लोकसंख्येतील बदल, पर्यावरणीय संकट आणि तंत्रज्ञान विस्फोट याचा मुलांच्या भविष्यावर मोठा प्रभाव पडणार असल्याचे अत्यंत धक्कादायक निष्कर्ष या अहवालात नमूद करण्यात आले आहेत. तसेच, यावर उपाययोजना करण्यासाठी विविध क्षेत्रांत गुंतवणूक महत्त्वाची असल्याचेही शिफारस करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे तंत्रज्ञानातले अत्याधुनिक बदल बालकांसाठी संधी आणि धोका दोन्ही आहे. मुले आधीच अॅप्स, खेळणी, व्हर्च्युअल सहाय्यक, गेम्स आणि शिकण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये ‘एआय’सह संवाद साधत आहेत; पण डिजिटल दरी अजूनही रुंद आहे. २०२४ मध्ये उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा अधिक लोक इंटरनेटशी जोडले गेले. दुसरीकडे कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये केवळ २६ टक्के लोक इंटरनेटशी जोडले गेल्याची माहिती समोर आली आहे.
हवामान बदलाच्या धोक्यांचा सामना करून, तंत्रज्ञान वापराच्या समान संधी देऊन आणि शिक्षणाला प्राथमिकता देऊन मुलांना आपण एका चांगल्या जीवनाची हमी देऊ शकतो. मुलांचे अधिकार आणि संधींची सुरक्षा करणारी उपाययोजना करण्यासाठी युवा प्रतिनिधींनी काम करणे आवश्यक आहे.
- गुरुप्रीत कौर, प्रतिनिधी, युनिसेफ
प्रत्येक मुलाला शिकण्याची, विकास करण्याची आणि नेतृत्व करण्याची संधी मिळेल, असे भविष्य आपल्याला घडवावे लागेल. मुले कोणत्याही परिस्थितीतून आली तरी शिक्षण, तंत्रज्ञान आणि हवामान बदलाविषयी केलेल्या कृतीचे एकत्रित परिणाम त्यांचे भविष्यावर होत आहे.
- पूजा विश्वकर्मा, प्रतिनिधी, युनिसेफ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.