पूर्व उपनगरातील शालेय परिसर तंबाखूमुक्त

पूर्व उपनगरातील शालेय परिसर तंबाखूमुक्त
Published on

पूर्व उपनगरांतील शालेय परिसर तंबाखूमुक्त
३०० अवैध टपऱ्या बंद, १,२०० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई
मुंबई, ता. ३० ः शालेय परिसर तंबाखूमुक्त व्हावा, या उद्देशाने गेले दोन महिने पूर्व उपनगरांतील शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिघात अवैधरीत्या तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी आक्रमक कारवाई केली. पोलिसांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून सुमारे ३०० अवैध पानटपऱ्या कायमस्वरूपी बंद केल्या. तसेच १ हजार २०० हून अधिक व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई केली.
या मोहिमेनंतर पूर्व उपनगरांतील मुलुंड ते घाटकोपरदरम्यानच्या उपनगरांत अर्थात पोलिस दलाच्या परिमंडळ-७च्या हद्दीतील सुमारे २५० शाळा, महाविद्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. या मोहिमेची सांगता गुरुवारी मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. या कार्यक्रमाला अभिनेते पुष्कर क्षोत्री, गौरव मोरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, उपायुक्त विजयकांत सागर, पोलिस अधिकारी, शालेय विद्यार्थी आणि स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी देश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी शपथ घेतली.
ही मोहीम अतिरिक्त आयुक्त पाटील, उपआयुक्त सागर, नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व उपनगरांतील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने पार पाडली.
सिगारेट, गुटखा ही नशेची पहिली पायरी असून, त्याची चटक शालेय जीवनातच लागते आणि पुढे ते व्यसन बनते. त्यामुळे शालेय परिसर तंबाखूमुक्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी ही धडक मोहीम हाती घेण्यात आली असल्‍याचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.

मोहिमेचे तीन टप्पे
पहिल्‍या टप्प्यात पूर्व उपनगरांतील सुमारे ६००हून अधिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात आली. शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखू सेवन गुन्हा आहे, हे सांगणारे प्रत्येकी दोन फलक लावण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात शाळेच्या १०० मीटर परिघातील अवैध पानटपऱ्या शोधून, पालिकेकडे पाठपुरावा करून त्या बंद केल्या. तिसऱ्या टप्प्यात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या शासनमान्य दुकानांना नोटीस जारी करून तेथून होणारी विक्री बंद करण्यात आली. शाळा परिसरात तंबाखू सेवन करणाऱ्या सुमारे १ हजार २०० हून अधिक व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com