

दिशा सालियनची वडिलांमुळे आत्महत्या
मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्टमध्ये दावा
मुंबई, ता. २८ ः ‘सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्याच केली होती, व्यावसायिक आयुष्यातील घडामोडी आणि वडिलांच्या प्रेमप्रकरणामुळे ती निराश होती, त्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले,’ असा दावा मालवणी पोलिसांनी फेब्रुवारी २०२१मध्ये या प्रकरणाचा तपास बंद करताना आपल्या अहवालात (क्लोजर रिपोर्ट) केला होता.
वडील सतीश आर्थिक अडचणीत असताना दिशाने त्यांना साहाय्य पुरविले होते; मात्र सतीश यांनी ही रक्कम व्यवसायात टाकण्याऐवजी प्रेयसीवर खर्च केल्याचे दिशाला समजले. त्यामुळे तिला धक्का बसला. यावरून त्यांच्यात वादही झाला. वडिलांच्या या कृतीने ती निराशही होती. दुसरीकडे व्यावसायिक आयुष्यातील घडामोडींमुळे ती कष्टी होती. तिने मेहनत घेतलेले दोन प्रकल्प काही कारणांमुळे खोळंबले होते. या दोन्ही घडामोडी तिने आपल्याला सांगितल्याचा दावा तिच्या प्रियकरासह जवळच्या मित्रपरिवाराने जबाबात केला होता. सुसाइड नोट नसल्याने चौकशी तपासातून पुढे आलेल्या माहितीनुसार दिशाच्या आत्महत्येमागे ही कारणे असू शकतात, असा निष्कर्ष मालवणी पोलिसांनी सुमारे नऊ महिन्यांच्या तपासानंतर काढला होता.
८ जून २०२० रोजी रात्री दिशाने मालाडच्या जनकल्याणनगर येथील रिजेंट गॅलेक्सी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मालवणी पोलिसांनी केला. शवचिकित्सा अहवाल, इन्कवेस्ट पंचनामा, परिस्थितीजन्य पुरावे, पालकांसह मित्रपरिवार आणि अन्य व्यक्तींचे जाबजबाब यावरून ही आत्महत्याच होती, असा निष्कर्ष काढला गेला. विशेष म्हणजे, हा निष्कर्ष तेव्हा दिशाचे वडील सतीश यांनी मान्य केला होता. त्यांनी कोणावरही संशय किंवा संशय निर्माण करणारी माहिती अथवा तक्रार केली नव्हती, असे एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. २०२३मध्ये शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक केली. या पथकाचा तपास अद्याप सुरू आहे.
...
पाच वर्षांनी तक्रार
सतीश यांनी पाच वर्षांनी दिशाची आत्महत्या नसून हत्या होती, हत्येपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले, अशी तक्रार उच्च न्यायालय आणि मुंबई पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवावा, अशी त्यांची मागणी आहे. तक्रारीत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग, अभिनेता दिनो मोरिया, सूरज पांचोली यांच्यासह अन्य व्यक्तींची नावे घेतली आहेत.
...
२०२३मध्ये या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन झाली याचाच अर्थ मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट अर्थहीन ठरतो. ही आत्महत्या नसून हत्या होती, पोलिसांनी आत्महत्येचा आभास निर्माण करण्यासाठी खोट्या, दिशाभूल करणाऱ्या नोंदी घेतल्या, ही बाब सतीश यांनी आधीच आपल्या तक्रारीत केली आहे. त्यामुळे मालवणी पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टमुळे आरोपींना कोणताही फायदा मिळणार नाही.
- ॲड. नीलेश ओझा, सतीश सालियन यांचे वकील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.