म्यानमारमध्ये सायबर गुलाम पुरवणाऱ्या टोळीस बेड्या

म्यानमारमध्ये सायबर गुलाम पुरवणाऱ्या टोळीस बेड्या
Published on

म्यानमारमध्ये सायबर गुलाम पुरवणाऱ्या टोळीस बेड्या

महाराष्ट्रातील ६० तरुणांची कैदेतून सुटका करण्यात सायबर विभागाला यश


मुंबई, ता. ११ : संघटित सायबर टोळ्यांनी भरघोस पगाराच्या नोकरीचे प्रलोभन दाखवत म्यानमार देशात कैदेत ठेवलेल्या महाराष्ट्रातील ६० तरुणांची सुटका करण्यात राज्याच्या सायबर विभागाला यश आले. याप्रकरणी पोलिसांनी म्यानमार, कंबोडिया आदी देशांत सायबर गुलाम म्हणून विकणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यात एका कझाकस्तानी नागरिकाचा समावेश आहे. उर्वरित चार आरोपी भारतीय आहेत.

महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या सायबर पोलिस यंत्रणांनी केलेल्या पाठपुराव्याआधारे परराष्ट्र मंत्रालयाने थायलंड सरकारच्या मदतीने केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एकूण ५६० भारतीय तरुणांची सुटका करण्यात आली. या तरुणांना थायलंड सीमेवरील म्यानमारच्या मियावाकी भागात चिनी, तैवानी व्यावसायिकांनी उभारलेल्या बंदिस्त इमारतींमध्ये ठेवण्यात आले होते. चार महिन्यांच्या कैदेत डोक्यावर शस्त्रांच्या धाकात, ठार मारण्याची धमकी देत या तरुणांकडून डिजिटल अरेस्ट, टास्क फ्रॉड आदी सायबर गुन्हे करण्यास भाग पडण्यात आले, अशी माहिती सायबर विभागाचे अतिरिक्त महासंचालक यशस्वी यादव यांनी शुक्रवारी (ता. ११) माध्यमांना दिली. समाजमाध्यमांवर परदेशात भरघोस पगाराची संधी, ही भामट्यांनी दिलेली फसवी जाहिरात पाहून संपर्कात आलेल्या तरुणांच्या प्रथम ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या. त्यात त्यांचे इंग्रजी, हिंदी भाषेवरील प्रभुत्व जोखण्यात आले. त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. थायलंडमध्ये नोकरी निश्चित झाल्याचे सांगून सर्वांना विमानाने तेथे नेण्यात आले. तेथून त्यांना म्यानमारच्या मियावाकी भागातील बंदिस्त इमारतींमध्ये डांबण्यात आले. सर्वांचे पासपोर्ट काढून घेतले गेले, सायबर गुन्हे, फसवणुकीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देऊन त्या कामात जुंपल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

असे झाले हाल
सुटका झालेल्यांपैकी एका तरुणाने आपली कैफियत मांडताना सांगितले, ‘कैदेत पडताच एक वर्षाचा करार करून घेण्यात आला. त्यात महिन्याला २५ हजार थाय बाथ इतका पगार नक्की केला गेला, बंदुकधारी तरुणांच्या सुरक्षेत ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पडण्यात आले. या कामात जराही कसूर झाली किंवा वर्तन चुकले, आवाज वाढला किंवा प्रतिशब्द आला की पगारातून दंड वसूल केला जाई. दोन दोन दिवस उपाशी ठेवले जात असे, हे काम करण्यास नकार देणाऱ्यांना तेथील प्रमुख अमानुष मारहाण करत. ठार मारू, अवयव काढून विकू, अशा धमक्या देत.’ चार महिन्यांच्या वास्तव्यात सोबतचे अनेक तरुण एकाएकी गायब झाल्याचा दावा या व्यक्तीने केला.

बंडखोर संघटनांची सुरक्षा
म्यानमारचा मियावाकी भाग येथील बंडखोरांच्या ताब्यात आहे. सुटका करण्यात आलेले तरुण तेथील डीबीएल कंपनीच्या चार मजली इमारतीत कैद होते. या इमारतीला बंडखोरांचे संरक्षण होते. विशेष म्हणजे, या भागात अशा अनेक इमारती असून विविध देशातील सायबर गुलामांकरवी गुन्हे करून घेतल्याची माहिती अटक आरोपींच्या चौकशीतून पुढे आली.

अभिनेता ते मानवी तस्कर
अटक आरोपी मनीष ग्रे ऊर्फ मॅडी हा तरुण म्यानमार येथील सायबर टोळ्यांना गुलाम पुरवणारा भारतातला प्रमुख दलाल असल्याचे सांगण्यात आले. तो मूळचा तमिळनाडूचा रहिवासी असून त्याने एका लोकप्रिय हिंदी मालिकेत भूमिका साकारली आहे. याशिवाय त्याने भारतात, थायलंड येथे निर्मित वेब मालिका, चित्रपटांमध्येही अभिनय केल्याची माहिती पुढे आल्याचे सांगण्यात आले. मनीष आपल्या संघटित टोळीमार्फत भारतीय तरुणांना फसवून गुलाम म्हणून म्यानमारमध्ये विकतो. प्रत्येक व्यक्तीमागे त्याला हजार अमेरिकन डॉलर मिळत, विशेष म्हणजे मनीष भारत, म्यानमार, थायलंड, मलेशिया या देशांत दडून ही मानवी तस्करी करतो, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com