भरपावसात आशा सेविकांचे आंदोलन

भरपावसात आशा सेविकांचे आंदोलन
Updated on

भरपावसात आशासेविकांचे आंदोलन
समान वेतन, रिक्त पदांवर भरती करण्याची मागणी
मुंबई, ता. १६ : मुंबई महापालिकेच्या आशासेविकांनी भरपावसात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. एकजुटीचा विजय होतोच, असा निर्धार करीत महापालिकेच्या सीएचव्ही (समुदाय आरोग्य स्वयंसेविका) म्हणून कार्यरत आशासेविकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतली आहे.
जोरदार पावसाच्या सरी कोसळत असतानाही डोक्यावर छत्री धरून आशासेविकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या कराव्यात, किमान वेतन लागू करावे, मानधन वेळेवर द्यावे, ओळखपत्रे, युनिफॉर्म आणि स्टेशनरी पुरवावी या मुख्य मागण्या त्यांनी मांडल्या. काम, जबाबदाऱ्या अधिक आणि मानधन मात्र अत्यल्प आणि अनियमित मिळत असल्‍याची भावना आशासेविकांमधून व्यक्त होत आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांच्यासोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत त्यांनी आशासेविकांना आंदोलन न करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय न झाल्याने अखेर त्यांनी आंदोलन केले.
एच वॉर्डमधील आशासेविका सोनल जाधव म्हणाल्या, ‘सरकारी आदेशानुसार आम्हाला आरोग्य सेविकांना दोन हजार रुपये मानधन वाढले पाहिजे. राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानामधील आशासेविकांना पाच हजार रुपयांची वाढ झाली, मात्र आम्हाला १,६५० रुपये मानधन मिळत नाही. त्यामुळे महापालिकेने आशासेविकांनाही त्या प्रमाणात वेतनवाढ द्यायला हवी.’ ‘समान कामासाठी समान वेतन हा आमचा मूलभूत हक्क आहे,’ असे आंदोलक आशासेविकांनी सांगितले.
आर दक्षिणमधील सरिता मुधोळकर म्हणाल्या, ‘१,६५० रुपयांमध्ये आम्ही महिनाभर तग धरतो. आम्हाला आमच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे पालिकेने आमच्या मागण्या लक्षात घ्याव्या आणि आम्हाला किमान वेतन द्यावे.’ ‘महापालिका प्रशासनाने मागण्यांबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात,’ अशी एकमुखी मागणी सर्व वॉर्डांतील आशासेविकांनी केली. यासंदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त शरद उघडे यांचीही आशासेविकांनी भेट घेतली.

मुख्य मागण्या :
- रिक्त सीएचव्ही पदांवर तातडीने नेमणुका
- किमान वेतन लागू करणे
- दरमहिन्याच्या १ ते १० तारखेमध्ये मानधन देणे
- ओळखपत्र, ॲप्रन, स्टेशनरी द्यावी किंवा त्याचा मोबदला मिळावा
- कामाचा वेळ १० ते २ असल्याने त्यानंतर काम करण्यास सांगू नये
- आठवड्यातून तीन दिवस हजेरी पुरेशी असताना त्यावर दररोज हजेरी लावणे बंधनकारक करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com