मुंबईकरांनो, पावसाळ्यात घरे सांभाळा!

मुंबईकरांनो, पावसाळ्यात घरे सांभाळा!

Published on

मुंबईकरांनो, पावसाळ्यात घरे सांभाळा!
दरवर्षी घरफोडीच्या सर्वाधिक घटनांची नोंद
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः मे महिन्याची मोठी सुट्टी चोऱ्या आणि घरफोड्यांचा हंगाम असल्‍याचा सर्वसाधारण समज आहे. प्रत्यक्षात पावसाळ्याच्या चार महिन्यांत शहरात सर्वाधिक घरफोड्या होतात. गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांच्या दप्तरी नोंद आकडेवारी सराईत घरफोड्यांसाठी पावसाळा हा उन्हाळी, हिवाळी सुट्ट्यांपेक्षा मोठा हंगाम असल्याचे स्पष्ट करते.
या पार्श्वभूमीवर येत्या जुलै, ऑगस्ट महिन्यात घरात असताना, घर बंद करून जाताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे पोलिस दलाकडून सांगण्यात येत आहे. सुमार सुरक्षा व्यवस्था आणि आसपास फारशी जाग नसलेली बंद घरे सराईत घरफोड्यांचे सहज लक्ष्य बनतात. गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याच्या सलग मोठ्या सुट्ट्यांमध्ये शहरातील बहुतांश कुटुंबे घर बंद करून गावी, पर्यटनासाठी देश विदेशात जातात. अशा घरांवर पाळत ठेवली जाते. दिवसा किंवा रात्रीच्या सुमारास या घरांना लागलेले कुलूप कटावणीच्या सहाय्याने बंद घराचा कडी-कोयंडा एका फटक्यात तोडून घरफोडे मौल्यवान वस्तू चोरी करतात.
एका वरिष्ठ, अनुभवी पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सराईत घरफोड्यांना गुन्हे करण्यासाठी दिवाळी, मे महिन्याच्या सलग मोठ्या सुट्ट्यांची गरज नाही. शनिवार, रविवार ही आठवडी सुट्टी किंवा त्यास जोडून आलेली नैमित्तिक रजेच्या दिवशीही घरफोड्या घडतात. याचे कारण मुंबईसारख्या महानगरांमध्ये पती, पत्नी दोघेही आठवडाभर आपापल्या कामात व्यस्त असतात. शनिवार, रविवारच्या सुट्टीला अशी कुटुंबे हमखास छोट्या सहलीसाठी बाहेर पडतात.
पावसाळ्यात गणेशोत्सव वगळता मोठी सलग सुट्टी नाही, मात्र तरीही या चार महिन्यांत सर्वाधिक घरफोडीच्या घटना नोंद होतात. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी मे महिन्यात घरफोडीचे १०६ गुन्हे नोंद झाले. तेच जूनमध्ये १२५, जुलैमध्ये १२४ आणि ऑगस्ट महिन्यात १२२ गुन्ह्यांची नोंद झाली.
२०२३ मध्येही हेच चित्र होते. २०२३ च्या मे महिन्यात १२५, तर जुलै महिन्यात १३४ घरफोड्या घडल्या. २०२१ मध्ये मे महिन्यात १०४, तर जून ते ऑगस्ट या पावसाळ्याच्या तीन महिन्यांत १२८ च्या सरासरीने ३८६ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली गेली. या आकडेवारीवरून मे महिन्याच्या तुलनेत जून, जुलै, ऑगस्ट हे महिने घरफोडीच्या दृष्टीने अधिक संवेदनशील ठरतात.
बैठ्या वस्त्यांमध्ये एरव्ही दारे सताड उघडी असलेली घरे पाऊस सुरू झाला की आड किंवा बंद केली जातात. कौले, पत्र्यावर पडणारी सर, खाली ओघळणाऱ्या पगोळ्याच्या आवाजात वस्तीत मध्यरात्री शिरलेल्या घरफोड्यांची चाहूल नागरिकांना घेता येत नाही.

सुरक्षा व्यवस्‍थेकडे लक्ष देण्याची गरज
शेजारील घरांतील लोक जागे असो किंवा नसो, बंद घराचे कुलूप उचकटून काढतानाचा आवाज पावसाच्या आवाजात दबून जातो. हिवाळा, उन्हाळ्याच्या तुलनेत वस्त्या, इमारतींची सुरक्षा व्यवस्था पावसाळ्यात आपोआप सैल पडते. धो-धो पावसात बहुतांश इमारतींचे सुरक्षा रक्षक आपल्या केबिनमध्ये असतात. छत्री, रेनकोटमुळे कोण आत आले, गेले यावर बारीक लक्ष ठेवणे अशक्य होते, शिवाय अनेक इमारतींमध्ये एकच सुरक्षा रक्षक नेमला जातो. तो त्याच्या कुटुंबासह त्या इमारतीच्या छोट्याशा केबिनमध्ये राहतो. तोच घराघरात फिरून कचरा गोळा करतो, साफसफाई करतो, पाणी सोडतो, वीजबिले पोहोचवतो आणि रहिवाशांची खासगी कामेही करतो.

कोण देते माहिती
बहुतांश घरफोडे एखाद्या साथीदाराला सोबत घेऊनच गुन्हा करतात. ते स्वतः अनेक वस्त्यांमध्ये फिरून बंद घरे टिपतात. फेरीवाले, विविध निमित्ताने इमारतीत ये-जा असलेले, वॉचमन आदींकडून त्यांना बंद घरांबाबत माहिती मिळते.

अशी पटते ओळख
रात्रीच्या वेळेत घराच्या प्रत्येक खोलीत अंधार, प्रत्येक खोलीच्या खिडक्या बंद, खिडकीबाहेर वाळलेले मात्र घरात न घेतलेले कपडे, यावरून गुन्हेगार एका झटक्यात ते घर बंद असल्याचे ओळखतात.

अशी घ्‍या काळजी
प्रत्येक सोसायटीने पुरेसे, प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नेमणे, सीसीटीव्ही उभारणे आवश्यक आहे, याशिवाय नेहमी न लागणाऱ्या मौल्यवान वस्तू बँकेत लोकरमध्ये सुरक्षित ठेवता येतात. घराला सेफ्टी डोअर, लॅच असल्यास घरफोडीचा प्रयत्न फसू शकतो, अशी प्रतिक्रिया पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवली.


आकडेवारी


२०२४ २०२३ २०२२ २०२१
ऑगस्ट १२२ ११३ १५९ १७२
जुलै १२४ १३४ १४६ १७३
जून १२५ ८९ १३४ १४१
मे १०६ १२५ १५७ १०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com