
बॉम्बे जिमखाना ः क्रीडा वारशाची नाबाद १५० वर्षे
२ जुलैला विविध उपक्रमांचे आयोजन
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः भारताची क्रिकेट पंढरी म्हणजे मुंबई. या क्रिकेटच्या मैदानांसाठी आणि जुन्या, पारंपरिक जिमखान्यासाठी मुंबई ओळखली जाते. असाच एक प्रतिष्ठित आणि मुंबईतला पहिला जिमखाना म्हणजे बॉम्बे जिमखाना. भारतीय क्रिकेट संघाशी एक ऐतिहासिक नातं जोडणाऱ्या या जिमखान्याने नुकतीच आपली १५० वर्षे पूर्ण केली. एखादा नवशिका फलंदाज हळूहळू क्रिकेटचे धडे गिरवून प्रगल्भ होतो आणि खेळपट्टीवर ठाण मांडून धडाकेबाज खेळी करतो, अगदी तसाच प्रवास या जिमखान्याने केला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १८७५ साली दोन ब्रिटीश सैन्य अधिकारी कॅप्टन ई. एल. मॅरिएट आणि लेफ्टनंट सी. एल. यंग यांच्या पुढाकाराने दक्षिण मुंबईच्या एका मोक्याच्या जागी या बॉम्बे जिमखान्याचा पाया रचला गेला. सुरुवातीला या जिमखान्यात फक्त ब्रिटीशांनाच प्रवेश होता; पण हळूहळू काळाच्या ओघात हे चित्र बदलले. खरंतर सुरुवातीच्या काळात क्रिकेट हा खेळ या जिमखान्याचा भाग नव्हताच.
जेव्हा देशातले इतर क्लब हे फक्त रग्बी आणि पोलो याच खेळांपुरते मर्यादित होते. त्या काळात जवळपास १२ विविध प्रकारचे खेळ या क्लबमधे खेळले जात होते. इतके विविध खेळ खेळवणारा हा देशातला पहिलाच क्लब होता. या क्लबमध्ये सुरुवातीला फक्त घोडेस्वारी, पोलो, रग्बी, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, रोलर स्केटिंग, बाउल्स आणि नौकानयन इतकेच खेळ खेळले जायचे. गंमत म्हणजे, १९३३ साली भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कसोटी सामना या जिमखान्याच्या मैदानावर खेळवला गेला. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात लाला अमरनाथ यांनी संस्मरणीय शतक झळकावले होते.
या कसोटीसाठी सी. के. नायडू आणि डग्लस रॉबर्ट जार्डिन हे प्रतिस्पर्धी कर्णधार होते. तो क्षण भारतासाठी एक गौरवशाली आणि तितकाच निर्णायक होता, कारण या कसोटी सामन्यानंतर क्लबच्या सदस्यत्वाची दारे भारतीयांसाठी खुली झाली, असे बॉम्बे जिमखान्याचे अध्यक्ष संजीव मेहरा यांनी सांगितले.
महिलांना सदस्यत्व देणारा पहिला क्लब
क्लबच्या स्थापनेपासूनच येथील सदस्य हे पुरुषच होते. सदस्यत्व पुढच्या पिढीकडे जाताना फक्त मुलाच्या नावाचा सदस्य म्हणून समावेश केला जात होता. बॉम्बे जिमखान्याने ही पद्धत मोडीत काढली आणि सदस्यांच्या मुलींनाही सदस्यत्व बहाल केले. तसेच महिलांना क्लबच्या व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीत उमेदवार व्हायला तसंच मतदान करायला परवानगी दिली, असे करणारा बॉम्बे जिमखाना पहिला क्लब असल्याचाही मेहरा यांनी आवर्जून उल्लेख केला.
गावस्कर, सोमय्या आणि भूपतीही सदस्य
या जिमखान्यामध्ये विविध खेळांतील मान्यवर खेळाडू हे सदस्य आहेत. त्यामध्ये लिटिल मास्टर सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, ज्येष्ठ हॉकीपटू एम.एम. सोमय्या, सर्वात जुने सदस्य विकाजी तारापोरवाला, टेनिसपटू महेश भूपती, विविध ऑलिंपिकपटू, राहुल बोस यांच्यासह व्यावसायिक, राजकीय नेते असे सहा हजारांहून अधिक सदस्य या क्लबला लाभले आहेत.
अनेक कार्यक्रमांचे आयोजन
बॉम्बे जिमखान्याचे अध्यक्ष संजीव शरण मेहरा म्हणाले, की दीड शतकपूर्तीनिमित्त आम्ही विविध खेळांसह अनेक कार्यक्रम आयोजित करणार आहोत. स्थानिक पातळीवरही आम्ही खेळ रुजवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही आमच्या स्वतःच्या अनेक ज्युनियर चॅम्पियनशिप आयोजित करणार आहोत. यासोबतच आम्ही शालेय, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करणार आहोत. त्यासोबतच वर्ल्ड स्पोर्ट जर्नालिस्ट डेनिमित्त येत्या २ जुलै रोजी विविध स्पर्धांचेही आयोजन करीत असल्याची माहिती मेहरा यांनी दिली.
हा केवळ क्लबसाठीच नाही तर मुंबईसाठी आणि सर्व क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण आहे. १५० वर्षे क्रीडा वारशाची गौरवशाली परंपरा अविरतपणे चालविणे हे आमच्यासाठी आव्हान होते, कारण हा क्रीडा वारसा खूप समृद्ध आहे.
- संजीव शरण मेहरा, अध्यक्ष, बॉम्बे जिमखाना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.