डिजिटल अटकेचे भूत कायम

डिजिटल अटकेचे भूत कायम

Published on

डिजिटल अटकेचे भूत कायम
मुंबईची डॉक्टर महिला आठ दिवस आभासी अटकेत; तीन कोटी उकळले
मुंबई, ता. २८ : पश्चिम उपनगरात व्यवसाय करणाऱ्या ७७ वर्षीय डॉक्टर महिलेस तब्बल आठ दिवस डिजिटल अटकेत ठेवून सायबर भामट्यांनी तब्बल तीन कोटी रुपये उकळल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सायबर गुन्ह्यांच्या पद्धती, त्यापासून वाचण्याच्या उपायांबाबत सुरू असलेली जनजागृती, मार्गदर्शक हेल्पलाईन प्रभावहीन ठरत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ताज्या प्रकरणात मे महिन्याअखेरीस दूरसंचार विभागाचा प्रतिनिधी भासवून एका व्यक्तीने या वृद्धेस संपर्क साधला. आपले आधार कार्ड वापरून एका व्यक्तीने सिम कार्ड घेतले असून, त्याबाबत गुन्हा नोंद झाला आहे. वृद्धेस काही अर्थबोध होण्याअगोदर अन्य एका व्यक्तीने गुन्हे शाखेचा उपायुक्त असल्याचे भासवत त्यांना संपर्क साधला. जेट एअरवेज घोटाळ्याच्या तपासात मुख्य आरोपी नरेश गोयल यांच्या घराची झाडाझडती घेताना तुमचे बँक खाते आणि डेबिट कार्डचे तपशील सापडले. त्यावरून या घोटाळ्यातील अवैध आर्थिक व्यवहारात आपला सहभाग आहे हे स्पष्ट होते, अशी भीती घातली.
या घोटाळ्यातील एक रुपयाही आपल्या खात्यावर आला असेल तर तीन वर्षांची कैद पक्की, असे सांगत वृद्धेला घाबरून सोडले. अटक टाळता येईल; मात्र तुमच्या बँक खात्यांतील जमा, गुंतवणूक आदींचे इत्थंभूत तपशील द्यावे लागतील. ही सर्व रक्कम एका खात्यावर जमा करावी लागेल. त्याची कसून तपासणी होईल. या घोटाळ्यातील रक्कम आपल्या खात्यावर आलेली नाही, हे स्पष्ट होताच ही रक्कम आपल्याला परत केली जाईल, असे या तोतया अधिकाऱ्याने सांगितले.
पुढे या वृद्धेला सर्वोच्च न्यायालय, ईडी, सीबीआय आदी यंत्रणांच्या नावे बोगस नोटिसा पाठवण्यात आल्या. व्हॉट्सॲप कॉलवर पोलिस ठाण्याचा आभास, पोलिस गणवेशात होणारी चौकशी अशा आभासावरून ही वृद्धा गर्भगळीत झाली. तब्बल आठ दिवस सुरू असलेल्या या आभासी अटकेत या वृद्धेने तब्बल तीन कोटी रुपये भामट्यांनी सांगितलेल्या खात्यावर वळते केले. हा सर्व प्रकार वृद्धेच्या पतीस समजला. त्याने एका नातेवाइकाशी त्याबाबत चर्चा केली असता या दाम्‍पत्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. जूनच्या पहिल्या आठवड्यात या वृद्धेने फसवणुकीबाबत सायबर पोलिस ठाण्यात (पश्चिम विभाग) तक्रार दिली. त्याआधारे गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे.


दिवसाकाठी आठ फसवणुकीचे गुन्हे
यावर्षी पहिल्या पाच महिन्यात मुंबईत १,८४१ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्यापैकी १,२९५ गुन्हे सायबर फसवणुकीचे आहेत. या आकडेवारीवरून पाच महिन्यांत दिवसाकाठी सरासरी आठ सायबर फसवणुकीचे गुन्हे शहरात नोंद झाले आहेत.

एकूण ९२ प्रकरणे
मुंबईत दाखल झालेल्या एकूण सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांत सर्वाधिक ३९३ प्रकरणे फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे करण्यात आली आहेत. त्याखालोखाल १५४ नोकरी फसवणूक, १०० विविध गुंतवणुकीच्या निमित्ताने फसवणूक आणि ९२ डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांचा समावेश आहे.

जनजागृती प्रभावहीन?
सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांना वाचवण्यासाठी मोबाईल कॉलर ट्यूनपासून जनजागृतीपर जाहिराती केल्या जात आहेत. बँका ग्राहकांना लघुसंदेश धाडत आहेत. पोलिस यंत्रणांकडून विविध हेल्पलाईन सुरू झाल्या आहेत. माध्यमांमधून हर प्रकारच्या सायबर गुन्हे, फसवणूक प्रकाराबाबत वृत्त प्रसिद्ध होत आहेत; तरीही डॉक्टर, वकील, इंजिनिअर, मोठ्या हुद्द्यावरील शासकीय अधिकारी असे शिक्षित, उच्चशिक्षित नागरिकांना सायबर भामटे लक्ष्य करीत आहेत. त्यावरून ही जनजागृती प्रभावहीन ठरत आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो.

जनजागृती आक्रमकपणे होत आहे, त्यावर खर्चही पुरेपूर केला जातोय. मात्र ही माहिती प्रत्येकापर्यंत किंवा प्रत्येक वयोगटातील व्यक्तीपर्यंत पोहोचतेय की नाही, याचे विश्लेषण होताना दिसत नाही. जनजागृतीसाठीची कॉलर ट्यून सुरू झाली की नागरिक फोन कट करून पुन्हा लावतात. एखादी रील असल्यास ती पूर्ण पाहिली जात नाही किंवा त्याचा परिणाम अपेक्षेप्रमाणे होताना दिसत नाही. याचाच अर्थ प्रत्येक वयोगटाचा टीव्ही, सोशल मीडियावरील रस पाहून त्यांचे लक्ष वेधून घेईल, मनावर बिंबेल असे साहित्य तयार व्हायला हवे.
- गौतम मेंगळे
सहाय्यक उपाध्यक्ष आणि सुरक्षा जागरूकता रणनीतीकार, सायबरफ्रॅट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com