मुंबईत भटकणाऱ्या तोतया आयएएस अधिकाऱ्यास अटक
मुंबईत भटकणाऱ्या तोतया आयएएस अधिकाऱ्यास अटक
मुंबई, ता. ३० : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सुरक्षा विभागाचा सहाय्यक संचालक असल्याचे भासवत शहरात तीन दिवस भटकणाऱ्या आणि शासकीय विश्रामगृहात ठाण मांडलेल्या तोतया आयएएस अधिकाऱ्यास गुन्हे शाखेने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी अटक केली. चंद्रमोहन सिंह असे या तोतयाचे नाव आहे. गेले तीन दिवस तो वांद्रे येथील सीमा शुल्क विभागाच्या अतिथीगृहात आयएएस अधिकारी असल्याचे भासवून वास्तव्य करीत होता.
२८ जून रोजी मुंबईत शासकीय अधिकारी असलेल्या मित्राच्या मदतीने चंद्रमोहन याने दिवसभरासाठी स्विफ्ट डिझायर कार भाड्याने घेतली होती. दरम्यान, एक व्यक्ती संशयास्पदरीत्या बडा शासकीय अधिकारी असल्याचे भासवून उत्तर मुंबईत भटकत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या दहिसर कक्षातील पथकाला मिळाली. या पथकाने मालाड परिसरात चंद्रमोहन प्रवास करीत असलेली कार रोखली. त्याने आत्मविश्वासाने आपले ओळखपत्र गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यास दाखवले. त्यावर शासकीय बोधचिन्ह, केंद्रीय गृह मंत्रालय, सुरक्षा विभागाचे सहाय्यक संचालक असे नमूद होते. मात्र ते बारकाईने पाहिले तेव्हा ते बोगस असावे, असा संशय आला. पथकाने चंद्रमोहन यास चौकशीसाठी कक्ष कार्यालयात आणले. चौकशीदरम्यान कार्यालय कुठे आहे, खातरजमा करण्यासाठी येथील संपर्क क्रमांक आदी प्रश्नांची सरबत्ती सुरू होताच चंद्रमोहन याचा आत्मविश्वास गळून पडू लागला. अखेर त्याने तोतया असल्याचे कबूल केले.
पोलिसांनी त्याचे वास्तव्य असलेल्या शासकीय निवासस्थानी शोधाशोध केली. तेथून १६ व्हिजिटिंग कार्ड, दोन मोबाईल, आधार, पॅन कार्ड आणि काही रोख रक्कम सापडली. चौकशी, तपासादरम्यान चंद्रमोहन याने आयएएस अधिकारी असल्याचे भासवून आणखी फसवणुकीशिवाय इतर कोणतेही गुन्हे केल्याची माहिती पुढे आलेली नाही. मात्र दादर येथे वाहतूक नियम मोडल्याबद्दल त्याची कार वाहतूक पोलिसांनी रोखली, तेव्हा त्याने बनावट ओळखपत्र दाखवून वेळ मारून नेली होती. त्याच्याकडून भविष्यात फसवणूक इत्यादी गुन्हे नक्की घडले असते, असे निरीक्षण गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवले.
इभ्रतीसाठी सारे काही
- चंद्रमोहन मूळचा बिहारच्या वैशाली जिल्ह्यातला. २०१७मध्ये तो यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला गेला होता. त्याचे तीन ते चार मित्र आयएएस, आयआरएस अधिकारी झाले; मात्र चंद्रमोहनला ते शक्य झाले नाही. त्यामुळे ते निराश होताच पण गावात, समाजात तोंड कसे दाखवावे, या विचाराने तो अधिक अस्वस्थ होता. तेव्हा त्याने आपण आयएएस झाल्याचे भासवले. स्वतःच बसून बनावट ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे तयार करून घेतली, अशी माहिती चौकशीतून समोर आल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.