युद्धाचा ज्वर, रियल इस्टेटला घोर!

युद्धाचा ज्वर, रियल इस्टेटला घोर!

Published on

युद्धाचा ज्वर, रिअल इस्टेटला घोर!
मुंबईसह एमएमआरमधील घरांच्या विक्रीत घट; ग्राहकांच्या सावध पवित्र्याचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : भारत-पाकिस्तानमध्ये दाटलेले युद्धाचे ढग आणि जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत देशातील रिअल क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. घर खरेदीदारांबरोबरच गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने तब्बल २० टक्क्यांनी घरांच्या खरेदीत घट नोंदली असून, त्याचा सर्वाधिक फटका मुंबईसह एमएमआरला बसला आहे. मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत मुंबई आणि परिसरात तब्बल ४१ हजार ४५० घरांची विक्री झाली होती, त्यामध्ये यंदा २५ टक्क्यांची घट झाली असून, एकूण घरांची विक्री ३१ हजार २७५ पर्यंत खाली आल्याचे ॲनारॉक या संस्थेच्या अहवालावरून समोर आले आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
रिअल इस्टेटच्या दृष्टीने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील घरांची विक्री महत्त्वपूर्ण मानली जाते. येथे जो ट्रेंड असेल त्याचीच छाया देशभरात दिसून येते, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली अस्थिरता आणि इंधनाच्या किमतीत होणारे चढ-उतार याचा थेट रिअल इस्टेट क्षेत्रावर परिणाम होतो. त्या पार्श्वभूमीवर ‘ॲनारॉक’ या रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने नुकताच आपला अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, बंगळूर, दिल्ली (एनसीआर), हैदराबाद, चेन्नई, कोलकाता या प्रमुख सात महानगरांत २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून) एक लाख २० हजार ३३५ घरांची विक्री झाली होती, त्यामध्ये चालू वर्षाच्या कालावधीत २० टक्क्यांची मोठी घट नोंदली असून, ती ९६ हजार २८५ पर्यंत खाली आली आहे.
सध्या भारत-पाकिस्तान आणि आखाती देशातील तणाव काहीसा निवळला आहे. तसेच आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्याने गृहकर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे चालू वर्षीच्या पुढील दोन्ही तिमाहीत रिअल इस्टेट क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

मुंबई, पुण्यात घसरण
दरम्यान, २०२५ च्या पहिल्या तिमाहीचा विचार करता देशातील प्रमुख सात शहरांत घरांच्या विक्रीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे, मात्र प्रामुख्याने ती हैदराबाद, दिल्ली, बंगळूर, चेन्नई येथील घरांच्या विक्रीचा प्रभाव असून, कोलकाता, पुणे आणि मुंबईत अनुक्रमे १० टक्के, चार टक्के आणि एक टक्के एवढी घट झाल्याचे चित्र आहे.

२०२५ आणि २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीतील घरांची विक्री
२०२५ - २०२४
मुंबईसह एमएमआर - ३१२७५ - ४१४५०
पुणे - १५४१० - २११४५
दिल्ली एनसीआर - १४३५५ - १६५५५
बंगळूर - १५१२० - १६३५५
हैदराबाद - ११०४० - १५०८५
चेन्नई - ५६६० - ५१००
कोलकाता - ३५२५ - ४५६०

देशाबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती असेल, तर त्याचा थेट परिणाम रिअल इस्टेटवर दिसतो. गुंतवणूकदार वेट अँड वॉचची भूमिका घेतात. त्याचाच परिणाम म्हणून मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत संपूर्ण देशात घराच्या मागणीत घसरण झाल्याचे दिसत आहे.
- अनुज पुरी,
अध्यक्ष, ॲनारॉक ग्रुप

जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा रिअल इस्टेट क्षेत्रावर परिणाम होतो. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. एखाद्या तिमाहीत घरांची विक्री कमी-जास्त होणे हा एक सायकलचा प्रकार आहे. अशी परिस्थिती आली तरच मार्केटमध्ये करेक्शन होते. त्यामुळे आज मागणी घटली तरी भविष्यात नक्कीच त्यामध्ये वाढ होते.
- केवल वालंबिया
मुख्य कार्यकारी अधिकारी, क्रेडाई-एमसीएचआय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com