परिवहन मंत्र्यांकडून ‘रॅपिडो’चा भांडाफोड
परिवहन मंत्र्यांकडून ‘रॅपिडो’चा भांडाफोड
परिवहनच्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : राज्य शासनाने कोणत्याही बाइक ॲपला अद्याप अधिकृत परवानगी दिलेली नसताना अवैधरीत्या ॲपद्वारे आरक्षण करून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रॅपिडो बाइकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रंगेहाथ पकडले.
शासनाने नुकतेच ई-बाइक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी-शर्तींचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांना यापुढे बाइक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाइक टॅक्सी या अनधिकृत आहेत. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला याबाबत विचारले असता, मुंबई अथवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप अस्तित्वात नाही, असे सरकारी उत्तर मिळाले. तथापि, त्याची उलट तपासणी करण्याच्या हेतूने मंत्री सरनाईक यांनी रॅपिडो बाइक टॅक्सी ॲपवर स्वतः अनोळखी नावाने बाइक बुक केली. पुढच्या १० मिनिटांमध्ये बाइक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकामध्ये हजर झाली. अशा प्रकारे अनधिकृतरीत्या बाइक ॲप चालवणाऱ्या संस्थेचा भांडाफोड स्वतः परिवहन मंत्र्यांनी केला.
...
बड्या धेंडांना शासन झाले पाहिजे!
एमएच ०१ ईयू ८५०१ या क्रमांकाची ही बाइक होती. त्या बाइकच्या चालकाला मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडे म्हणून ५०० रुपये देऊ केले. तसेच तुझ्यासारख्या गोरगरिबावर गुन्हा दाखल करून आम्हाला काहीच साध्य होणार नाही. तथापि, यामागे लपलेल्या बड्या धेंडांना शासन झाले पाहिजे, हाच आमचा हेतू आहे, असे ते म्हणाले.
...
परवानगी नसताना बाइक टॅक्सी चालवली याबाबत रॅपिडो, ओला आणि उबर या तिन्ही कंपन्यांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे. तसेच बाइक टॅक्सी सुरू असताना कोणतीही बाइक टॅक्सी सुरू नसल्याचे उत्तर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यावर अनोळखी नावाने बाइक टॅक्सी बुक केली. आता बाइक टॅक्सी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.