संक्रमण शिबिरातून सुटकेचा मार्ग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : कामाठीपुराच्या पुनर्विकासातून म्हाडाकडून हजारो घरे तयार केली जाणार आहेत. पुनर्वसन सदनिकांबरोबर म्हाडाला ४४ हजार चौरस मीटरचे क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून तयार होणाऱ्या सदनिका मास्टर लिस्टवर रहिवाशांना देण्याचा म्हाडाचा विचार आहे. त्यामुळे सध्या संक्रमण शिबिरात दिवस काढणाऱ्या २९५ इमारतींमधील रहिवाशांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
३४ एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरात मोडकळीस आलेल्या ९४३ जुन्या इमारती आहेत. म्हाडाचे इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ या इमारतींचा पुनर्विकास या संस्थेच्या माध्यमातून करणार आहे. त्यानुसार नऊ हजार रहिवासी-भाडेकरूंना ५०० चौरस फुटाची सदनिका दिली जाणार आहे. तर जागा मालक सदनिका आणि म्हाडालादेखील मोठ्या प्रमाणात चटई क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे. याअंतर्गत दक्षिण मुंबईतील २९५ सेस इमारतीच्या जागी नव्याने इमारती उभारणे शक्य नाही. त्यामुळे रहिवाशांचा मास्टर लिस्टमध्ये समावेश करताना सेस इमारतीच्या पुनर्विकासातून उपलब्ध होणाऱ्या सदनिका दिल्या जात आहेत; मात्र त्याचे प्रमाण कमी असल्याने कामाठीपुरा पुनर्विकासातून म्हाडाला मिळणाऱ्या सदनिका मास्टर लिस्टवरील रहिवाशांना देण्याचा विचार असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच सरकारला पाठवला जाणार आहे.
----------------------------------
३०० चौरस फुटांचे घर
मास्टर लिस्टवरील रहिवाशांना किमान ३०० चौरस फुटांचे घर देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कामाठीपुरा पुनर्विकासातून मिळणारी घरे ३००-४०० चौरस फूट क्षेत्रफळाची असावीत, त्या दृष्टीने म्हाडाकडून नियोजन सुरू आहे.
---------------------------------
मास्टर लिस्ट म्हणजे काय?
उपकर प्राप्त जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीची जागा कमी असल्याने किंवा भूखंड पालिकेच्या आरक्षणामुळे बाधित झाला असेल, रस्त्यात गेला असेल तर त्यावर नव्याने इमारत उभारता येत नाही. त्यामळे अशा बाधित इमारतीमधील रहिवाशांचा म्हाडाकडून मास्टर लिस्टमध्ये समावेश केला जातो. त्यांना इतरत्र पुनर्रचित इमारतीमधील अतिरिक्त सदनिका मालकीतत्त्वावर दिल्या जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.