केईएममध्ये उद्यापासून एचएमआयएस प्रणाली

केईएममध्ये उद्यापासून एचएमआयएस प्रणाली

Published on

केईएममध्ये उद्यापासून एचएमआयएस प्रणाली
केसपेपर ते फाइल बाळगण्याची गरज नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : महापालिकेच्या केईएम रुग्णालयात शनिवार, १ ऑगस्टपासून ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात केईएम रुग्णालयात, त्‍यानंतर पूर्ण क्षमतेने इतर रुग्णालयांमध्येही या प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे.
पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की पालिकेच्या केईएम रुग्णालयापासून एचएमआयएसची सुरुवात होईल. याआधीच पालिकेचे १७७ दवाखाने, २७ प्रसूतिगृहे आणि एचबीटी दवाखान्यांमध्येही हळूहळू एचएमआयएस ही डिजिटल प्रणाली सुरू केली आहे. आता ही सर्व केंद्रे एकमेकांशी जोडली जातील. रुग्णालयीन कामकाज पूर्णपणे संगणकीकृत होणार आहे. या नव्या यंत्रणेमुळे रुग्णांच्या नावनोंदणीपासून ते चाचण्या, अहवाल, औषधे, डिस्चार्ज प्रक्रिया अशा प्रत्येक टप्प्यावर डिजिटल नोंदी होणार आहेत. त्यामुळे रुग्णांचा वेळ वाचणार असून, डॉक्टर आणि कर्मचारीवर्गासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
केईएमची ओपीडी, आयपीडी, रुग्णांचा भार जास्त आहे. इथले विभाग सुपरस्पेशालिटी आहेत. सर्व प्रयोगशाळा, आपत्कालीन विभाग, रक्तपेढी, आयपीडी, ओपीडी, फार्मसी हे विभाग एकमेकांशी जोडले जातील. या योजनेंतर्गत रुग्णांना युनिक आयडी दिला जाणार होता. पण ही पद्धती फार खर्चीक आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपवर एक माहितीचा संदेश दिला जाईल. याद्वारे रुग्णांना सर्व विभागांशी जोडले जाईल.
व्हॉट्सॲपद्वारे रक्त तपासणी, एक्स-रे, एमआरआय, सोनोग्राफी अशा चाचण्यांचे अहवाल थेट डॉक्टरांच्या संगणकावर दिसतील. औषधांचे वितरणदेखील अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय रुग्णाच्या डिस्चार्जनंतरचे फॉलोअप तपशील, पुन्हा भेटीची वेळ अशा गोष्टीदेखील ऑनलाइन ट्रॅक करता येणार आहेत.

या प्रणालीमुळे रुग्णाची फाइल सतत बरोबर वाहून नेण्याची गरज संपणार असून, सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित राहणार आहे. ही प्रणाली केवळ केईएमपुरती मर्यादित न राहता टप्प्याटप्प्याने सायन, नायर, कूपर, राजावाडी, एम. डब्ल्यू. देसाई, कांदिवली शताब्दी, कुर्ला भाभा या उपनगरीय रुग्णालयांमध्ये आणि सुमारे २७ प्रसूतिगृहांतदेखील सुरू केली जाणार आहे.

रुग्णांसह डॉक्टरांना फायदे
एचएमआयएस प्रणालीच्या मदतीने रुग्ण आणि डॉक्टर दोघांचाही वेळ वाचतो. एकदा रुग्णनोंदणी केल्‍यानंतर एक ओळख क्रमांक मिळतो. फॉलोअपसाठी रुग्‍ण आल्‍यानंतर डॉक्टरांना एका क्लिकवर त्याचा आरोग्य इतिहास मिळतो. त्याचे रक्त, एक्स-रे आणि इतर अहवालदेखील ऑनलाइन अपलोड केले जातात. सामान्य प्रक्रियेला १० ते १२ मिनिटे लागतात, परंतु एचएमआयएसच्या मदतीने रुग्ण चार ते पाच मिनिटांत काम आटोपू शकते.

मनुष्यबळाची मागणी
केईएम रुग्णालयाच्या परिचारिकांनी एचएमआयएस पद्धतीचे स्वागत केले असले तरी वॉर्डचा भार पाहता ही यंत्रणा आणि रुग्णांचा अहवाल भरण्यासाठी अतिरिक्त आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com