दिव्यांग प्रौढांसाठी रोजगार, प्रशिक्षणाची संधी
दिव्यांग प्रौढांसाठी रोजगार, प्रशिक्षणाची संधी
टुगेदर फाउंडेशनच्या नव्या दालनांचे सारा तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : बौद्धिक दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत असलेल्या टुगेदर फाउंडेशनच्या दोन नव्या व्यावसायिक दालनांचे उद्घाटन बुधवारी (ता. ३०) क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकरच्या हस्ते अंधेरीत पार पडले.
फाउंडेशनच्या संरक्षित कार्यशाळेचा भाग असलेल्या या दुकानांमध्ये एफएसएसएआय मान्यताप्राप्त बेकरी उत्पादने आणि हस्तकला वस्तूंची विक्री केली जाते. या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून लाभार्थ्यांना स्टायपेंड दिले जाते. या वेळी सारा तेंडुलकर म्हणाली, की ही दुकाने म्हणजे आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग आहे. या संस्थेचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. फाउंडेशनच्या संस्थापक संगीता चक्रपाणी म्हणाल्या, की दिव्यांग प्रौढांसाठी रोजगार, शिक्षण आणि सन्मानाने जगता येईल, असे व्यासपीठ हे आमचे स्वप्न होते. आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला मिळतो आहे, असे तिने सांगितले.
२०१५ मध्ये संगीता व व्ही. चक्रपाणी यांनी ऑटिझम असलेल्या मुलींच्या प्रेरणेने ही संस्था स्थापन केली. ही शाळा नसून शिकण्याच्या, कमावण्याच्या आणि स्वावलंबी जीवन जगण्याच्या संधी निर्माण करणारे केंद्र आहे. या कार्यक्रमात फाउंडेशनच्या नव्याने नूतनीकरण केलेल्या परिसराचेही उद्घाटन करण्यात आले.