जीटी रुग्णालयात नवीन वैद्यकीय महाविद्यालय
जीटी रुग्णालयात नवीन वैद्यकीय महाविद्यालय
राज्य सरकार २१० कोटी रुपये खर्च करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईतील गोकुळ दास तेजपाल (जीटी) रुग्णालयाच्या आवारात नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारण्यासाठी राज्य सरकारने २१० कोटी ७६ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
हा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या उच्चस्तरीय समितीच्या २९ मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संबंधित जागा जीटी रुग्णालय आवारात उपलब्ध असून, सर्व संबंधित विभागांची पूर्वपरवानगी घेऊनच प्रत्यक्ष काम सुरू होईल.
या प्रकल्पात १२ मजली नवीन महाविद्यालय इमारत, मुले व मुलींसाठी १२ मजली स्वतंत्र वसतिगृह, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, अंतर्गत व बाह्य वीज योजना, अग्निसुरक्षा यंत्रणा, लिफ्ट्स, एचव्हीएसी, सीसीटीव्ही व लॅन सिस्टीम, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, परिसर प्रकाशयोजना, पंपहाउस, बोअरवेल, अंतर्गत रस्ते, पार्किंग, लँडस्केपिंग, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्था, फर्निचर, अंतर्गत सजावट आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. संपूर्ण कामासाठी आराखडे सरकारी वास्तुविशारदने तयार केले असून, खासगी वास्तुविशारदमार्फत काम केल्यास ते आराखडे साक्षांकित करणे बंधनकारक असेल.
विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा
या प्रकल्पामुळे जीटी रुग्णालयाचा परिसर केवळ आरोग्यसेवेपुरता मर्यादित न राहता वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीनेही सक्षम आणि आधुनिक स्वरूप धारण करणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, राहण्याची उत्तम व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने हे केंद्र भविष्यातील महत्त्वाचे वैद्यकीय हब ठरण्याची शक्यता आहे.
असा होणार खर्च
प्रमुख बांधकामासाठी १०४ कोटी ३४ लाख रुपये, विद्युत, अग्निसुरक्षा, लिफ्ट, एचव्हीएसी, सीसीटीव्ही, लॅन व इतर यंत्रणांसाठी १८ कोटी ३६ लाख रुपये, स्वच्छता, फर्निचर, सजावट यासाठी २९ कोटी ५६ लाख रुपये, परिसर विकासासाठी १२ कोटी ३४ लाख रुपये आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी), विमा, भाववाढ, प्रकल्प व्यवस्थापन शुल्क (पीएमसी) व इतर तरतुदींसाठी ५६ कोटी १५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
बांधकामाला दोन-तीन वर्षे लागणार
रुग्णालयाने गेल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांची पहिली एमबीबीएस बॅच सुरू केली होती आणि सध्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) कडून १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मंजुरीची वाट पाहात आहे. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालयाचा विस्तार करण्यासाठी आम्हाला लगतची इमारत लागणार आहे, कारण सध्याची इमारत ही हेरिटेज वास्तू आहे आणि दुरुस्तीवर मर्यादा आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले.