तोतया, भामट्यांचे फसवणुकीचे जाळे

तोतया, भामट्यांचे फसवणुकीचे जाळे

Published on

तोतया, भामट्यांचे फसवणुकीचे जाळे
शासकीय कंत्राटे, शासन स्तरावरील अडलेली कामे करून देण्याच्या प्रलोभनातून कोट्यवधींची लुबाडणूक
मुंबई, ता. ३१ ः स्वस्तात घर, भरघोस पगाराच्या नोकरीपासून गुंतवणुकीवर दुप्पट परताव्यापर्यंत विविध प्रकारची प्रलोभने दाखवून लुबाडणूक करणाऱ्या भामट्या टोळ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना जेरीस आणले होते. त्यातच आता कोट्यवधींचे शासकीय कंत्राट, शासकीय विभागाच्या परवानगीसह शासन स्तरावर अडलेली, न होणारी कामे करून देतो, असे प्रलोभन दाखवत या टोळ्यांनी महानगर प्रदेशातील व्यावसायिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
अशा फसवणुकीचा एक नमुना अलीकडेच समोर आला. विद्याविहार येथे राहणाऱ्या आणि ठाणे, रायगड जिल्ह्यात लाकडी, धातूचे फर्निचर बनविण्याच्या कारखान्याच्या मालकाकडून भामट्यांनी १५० कोटींचे शासकीय कंत्राट मिळवून देतो, असे सांगत तब्बल सहा कोटी रुपये उकळले.
१५० कोटींच्या कंत्राटात होणाऱ्या फायद्याच्या गोळाबेरजेने हुरळून गेलेला व्यावसायिक पुढील धोका ओळखू शकला नाही. गुगलवर एका क्लिकसह तो स्वतःच्या फसवणुकीचा डाव उधळून लावू शकला असता, मात्र आरोपींनी अचूक आभास उभा केल्याने त्यांच्याबाबत चौकशी, कंत्राट प्रक्रियेबाबतची माहिती घ्यावी, असा विचारही या व्यावसायिकाच्या मनाला शिवला नाही, असे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी वांद्रे पोलिसांनी या पाच आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

तोतया मंत्री आणि ओएसडी
व्यावसायिकाकडे सल्लागार म्हणून काम करणाऱ्या नितीन गुप्ता याने रमेश बनसोडे, बालाजी पवार, उद्धव भामरे आणि कौस्तुभ भामरे या आरोपींची भेट घालून दिली. यातील बनसोडे याने माजी मंत्री, पवार याने आरोग्यमंत्र्याचा, तर भामरे याने ‘फूड अँड ड्रग्ज’ मंत्र्याचा ओएसडी असल्याचे भासवले, तर कौस्तुभ भामरे याने आयएएस असल्याचे सांगितले.

१५० कोटींचे कंत्राट
या सर्वांनी व्यावसायिकाला राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांसाठी सुमारे १८ हजार आयसीयू बेड तयार करण्याचे सुमारे १५० कोटींचे कंत्राट देऊ, असे भासवले. सर्व प्रक्रिया पूर्ण करून शासकीय अध्यादेश जारी होईल, त्यानंतर आठ दिवसांनी ३५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाईल, असे सांगितले, मात्र त्यातील ३० टक्के रक्कम आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांना द्यावी लागेल. तसेच तीन टक्के रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आम्ही वाटून घेऊ, अशी अट ठेवली.

असा निर्माण केला आभास
- प्रत्येक वेळी आरोपी आलिशान हॉटेलमध्ये व्यावसायिकाला भेटत. गळ्यात शासकीय ओळखपत्र लटकवून, महाराष्ट्र शासन असा स्टिकर चिकटवलेल्या वाहनातून येत. त्यांच्या चर्चांमुळे व्यावसायिकाला ते खरेच शासकीय अधिकारी असल्याचा भास झाला. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी व्यावसायिकाच्या कारखान्याची तपासणी केली, या तपासणीचा लेखी अहवालही तयार केला. तसेच व्यावसायिकाला नमुना म्हणून एक खाट तयार ठेवण्याची सूचना केली आणि कोटेशनही तयार ठेवण्यास सांगितले. त्यामुळे व्यावसायिकाचा आरोपींवर विश्वास बसला.

आर्थिक सहाय्य करणाऱ्यांनाही घेतले विश्वासात
आरोपींनी कंत्राटाची शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या निमित्ताने व्यावसायिकाकडे सहा कोटी मागितले. व्यावसायिकाने स्वतःची जमापुंजी, मित्रांकडून उसने घेऊन सहा कोटी रुपये आरोपींना दिले. व्यावसायिकाला आर्थिक मदत करणाऱ्या काही या कंत्राटाबाबत साशंक होते. पैसे बुडण्याची, फसवणूक होण्याची भीती त्यांना होती. व्यावसायिकाने ही बाब कानी घातली तेव्हा आरोपींनी संबंधित व्यक्तींशी स्वतः संपर्क साधून मंत्री, ओएसडी असल्याचे भासवून ही रक्कम तुम्हाला आठ दिवसांत परत मिळेल, असे आश्वासन दिले.

पोलिस काय म्हणतात?
अनेक व्यक्तींना एकाच वेळी छोट्या-मोठ्या रकमांसाठी फसवण्याची पद्धत रूढ झाली होती. या गुन्ह्यावरून एकाच व्यक्तीला मोठ्या रकमेला लुबाडण्याची पद्धत पुन्हा सुरू होते की काय, अशी भीती आहे. फसवणूक टाळण्यासाठी समोरून आलेली प्रत्येक संधी सर्व बाजूंनी चाचपून घ्यावी. खातरजमा झाल्यानंतरच आर्थिक व्यवहार करावेत. या प्रकरणात व्यावसायिकाने गुगलवर रमेश बनसोड किंवा प्रकाश आंबिटकर ही नावे जरी टाईप केली असती तरी त्याची फसवणूक टळली असती.

अन्य प्रकरणे
- देशभरात रेडीमिक्स काँक्रीटचे कारखाने चालवणाऱ्या व्यावसायिकाला मुंबई, ठाणे आणि नवीमुंबईतही प्लांट सुरू करण्याची इच्छा होती. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी/ना हरकत आवश्यक होती, मात्र ती मिळवण्यात अनेक अडथळे होते. ती परवानगी सहज मिळवून देतो, असे सांगत एका व्यक्तीने या कंपनीकडून ४६ लाख रुपये घेतले. बनावट ना हरकत कंपनी मालकाच्या हाती ठेवली.
- बांधकाम व्यावसायिकाला कमी व्याजदरात २५ कोटींचे कर्ज अपेक्षित होते. ते मिळवून देतो, असे सांगत तीन भामट्यांनी अडीच कोटी रुपये घेत पोबारा केला. या दोन्ही प्रकरणात आरोपींनी व्यावसायिकांचा इतका विश्वास संपादित केला की इतकी मोठी रक्कम देताना त्यांच्या मनात जराही शंका आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com