अखेर आपली चिकित्‍सा मुंबईकरांच्या सेवेत

अखेर आपली चिकित्‍सा मुंबईकरांच्या सेवेत

Published on

अखेर आपली चिकित्‍सा मुंबईकरांच्या सेवेत
आजपासून रक्त चाचणी अहवाल नाममात्र दरात; व्हॉट्सॲपवर होणार उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : पालिकेची मोफत चाचणी सुविधा ‘आपली चिकित्सा’ सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर उद्यापासून (ता. १) पुन्हा सुरू होणार आहे. आपली चिकित्सा सुविधेसाठी ‘सकाळ’ने वारंवार पाठपुरावा केला होता. ९ जुलैच्या ‘सकाळ’च्या अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानुसार आता या सुविधेचा मुंबईकरांना लाभ घेता येणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य संस्थांमध्ये बाह्यस्रोताद्वारे नागरिकांना नाममात्र दरात रक्त चाचणी सुविधा उपलब्ध होईल. मूलभूत व प्रगत तपासण्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुंबई महापालिकेची उपनगरीय रुग्णालये, दवाखाने, आपला दवाखाना, पॉलिक्लिनिक, प्रसूतिगृहे तसेच विलेपार्लेस्थित डॉ. रू. न. कूपर रुग्णालय व जोगेश्वरीस्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महापालिका रुग्णालय यांचा या सुविधेत समावेश असेल.

विचारपूर्वक चाचण्यांचे निर्देश
आपली चिकित्सा सुविधेचे ‘लाइफनिटी हेल्थ’ नावाच्या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या वेळेस रुग्णांच्या चाचण्या करताना विचारपूर्वक कराव्यात, असे निर्देश वरिष्ठांनी दिले आहेत.

सुरुवातीला १०० संस्थांमध्ये सुविधा
महापालिकेच्या १०० आरोग्य संस्थांमध्ये सुरुवातीला सुविधा दिली जाईल. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत सर्व दवाखान्यांमध्ये ही सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.

इथे सुविधा सुरू होणार
- १६ उपनगरीय रुग्णालये
- ३० प्रसूतिगृहे
- ५ विशेष रुग्णालये
- डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय
- एचएचबीटी ट्रॉमा रुग्णालय
- विभाग ‘ए’ ते ‘ई’मधील सर्व महापालिका दवाखाने

व्हॉट्सॲपद्वारे मिळणार रक्त चाचणी अहवाल
मुंबई महापालिकेच्या धोरणांतर्गत रुग्णांना रक्त चाचणी अहवाल व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध होऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणालीद्वारे सर्व रुग्णांच्या माहितीचे संकलन, व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

चाचण्यांचे दर
- ६६ मूलभूत तपासण्या व १७ प्रगत अशा ८३ तपासण्या करण्यात येणार आहेत.
- मूलभूत चाचण्या ‘ए’साठी प्रति चाचणी १०० रुपये
- मूलभूत चाचण्या ‘बी’करिता ९९ रुपये
- अंदाजित दर  अनुक्रमे प्रति चाचणी ९० रुपये आणि १२० रुपये
- प्रगत तथा विशेष चाचण्यांसाठी प्रति चाचणीचा दर ३९८ रुपये

१२० लाख चाचण्यांचे लक्ष्य
नव्या निविदा प्रक्रियेत ठेकेदाराला चार वर्षांत १२० लाख चाचण्या करणे बंधनकारक आहे. यासोबतच सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल संध्याकाळी ८ वाजेपर्यंत बंधनकारक आहेत. 


संस्थेकडून वार्षिक केल्या जाणाऱ्या चाचण्यांची संख्या
- मूलभूत रक्त चाचण्या ए (संख्या ४३) : वार्षिक चाचण्यांची संख्या - १२ लाख
- मूलभूत रक्त चाचण्या बी (संख्या २३) : वार्षिक चाचण्यांची संख्या - ३ लाख
- विशेष तथा प्रगत रक्त चाचण्या (संख्या १७) : वार्षिक चाचण्यांची संख्या - २ लाख ७० हजार

संपूर्ण मुंबईसाठी एकच संस्था
आपली चिकित्सा सुविधेअंतर्गत संपूर्ण मुंबईसाठी एकच संस्था नियुक्त केली आहे. मागील वेळेचा अनुभव घेता क्रस्ना डायग्नोस्टिकप्रमाणे एकूण चाचण्यांचे लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर या संस्थेने पुढे सेवा देण्यास नकार दिल्यास पुन्हा ही योजना काही काळासाठी बंद होऊन महापालिका दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांना या योजनेपासून वंचित राहावे लागेल, अशा प्रकारची भीती वर्तविली जात आहे. २०१९मध्ये आपला दवाखाने, प्रसूतिगृहे आणि रुग्णालयांमध्ये  आपली  चिकित्सा  योजना सुरू केली होती. दीड वर्षापूर्वी निर्धारित संख्येच्या चाचण्या पूर्ण झाल्यामुळे निविदा संपली आणि ही योजना डिसेंबर २०२४मध्ये थांबवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com