पालिकेत बनावट हजेरीचा खेळ :

पालिकेत बनावट हजेरीचा खेळ :

Published on

पालिकेत बनावट हजेरीचा खेळ
एकाच दिवसात दोन विभागांमध्ये नोंद; नजरचूक असल्‍याचा अधिकाऱ्यांचा दावा
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पालिकेत सुरक्षा सेवांचे कंत्राट मिळवलेल्या कंपनीने बनावट हजेरी दाखवून वर्षानुवर्षे कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर हा प्रकार ‘नजरचूक’ असल्याचा अजब दावा करीत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्‍यामुळे या प्रकरणात पालिकेच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे.
मुंबई महापालिका आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्याकडून सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कंत्राट मिळवलेल्या ईगल सिक्युरिटी अ‍ॅण्ड पर्सनल सर्व्हिसेस प्रा. लि. या खासगी कंपनीने कोट्यवधी रुपयांचा सरकारी निधी लाटल्याचा गंभीर आरोप होत आहे. सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद खरात, अजय यादव यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार घेतलेल्या माहितीतून हा प्रकार उघड झाला आहे.

चुकीच्या पद्धतीने वसुली
माहिती अधिकारानुसार मिळालेल्या हजेरी पत्रकांनुसार जानेवारी २०२४मध्ये काही सुरक्षारक्षक एम पूर्व व एम पश्चिम विभागांमध्ये एकाच दिवशी हजेरीवर होते. मोहम्मद खान आणि मनबोध सिंग हे कर्मचारी एका दिवसात दोन्ही ठिकाणी हजेरीवर दाखवण्यात आले असून, दोन्ही ठिकाणचे बिल कंपनीने पालिकेकडून वसूल केले आहे.

अस्तित्वात नसलेल्या केंद्रासाठी सुरक्षा रक्षक
एम पश्चिम विभागात ‘हेल्थ केअर सेंटर’च्या नावाने सुरक्षा रक्षक हजेरीवर दाखवण्यात आले. मात्र असे कोणतेही केंद्र अस्तित्वात नसल्याचे खुद्द महापालिकेचे सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कंपनीने बनावट स्वाक्षऱ्या करून लाखो रुपयांची बिल सादर करून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप आहे.

चौकशीत घोटाळ्यावर शिक्कामोर्तब
महापालिका सुरक्षा दल विभागाकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. याबाबतच्या अहवालात त्यांनी नमूद केले आहे की, एम पूर्व व एम पश्चिम विभागाच्या सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांकडून संबंधित कंपनीला एकूण ५८८ दिवसांच्या म्हणजेच १९ महिने १० दिवस उपस्थितीचे जास्तीचे अधिदान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या जास्तीच्या अधिदानाची वसुली करण्यात यावी, असे प्रमुख सुरक्षा अधिकारी कार्यालयात कळविण्यात आले असल्याचे तपास अधिकाऱ्याने कळवले आहे.

चौकशी अहवाल
देवनार पशुवधगृह, देवनार क्षेपणभूमी येथील सुरक्षा रक्षकांची उपस्थिती स्वाक्षरी करून पुढील अधिदानाकरिता पाठविण्यात येते. या गडबडीत नजरचुकीने स्वाक्षरी झालेली आहे, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच एम पश्चिम विभाग कार्यालयाकरिता कोणतेही सुरक्षा मदतनीस नेमण्यात आलेले नसतानासुद्धा हेल्थ सेंटरच्या नावे सुरक्षा रक्षक उपस्थितीत असल्याचे दाखवण्यात आले. येथेदेखील अनावधानाने स्वाक्षरी केल्याचे उपप्रमुख सुरक्षा अधिकारी मनवाडकर यांनी चौकशी अहवालात म्हटले आहे.

हजेरीवर २८ सुरक्षा रक्षक, प्रत्यक्षात कुणीच नाही!

एम पूर्व विभागात २८ सुरक्षा रक्षक आणि तीन सुपरवायझर हजेरीवर असून, प्रत्यक्षात ते कधीच दिसले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्येदेखील मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘एमएमआरडीए’ची ही फसवणूक
काही सुरक्षा रक्षक महापालिकेच्या हजेरीवर १६ तास आणि त्याच दिवशी एमएमआरडीएच्या हजेरीवरही कार्यरत असल्याचे दाखवले आहे, म्हणजेच त्यांनी २४ तास काम केल्याचा दावा करून महापालिकेसह एमएमआरडीए प्रशासनाचीदेखील सरळ सरळ फसवणूक केली आहे.

पीएफ न भरता बिले मंजूर
महापालिकेच्या टेंडर अटींनुसार सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पीएफ भरणे आवश्यक आहे. मात्र या कंपनीने अनेक सुरक्षा रक्षकांचा पीएफ भरलेला नाही; तरीही त्यांच्या नावाने बिले सादर करण्यात आली आहेत. या प्रकरणाची तक्रार प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांच्याकडे करण्यात आली होती, मात्र त्यांनी आजवर कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

पालिका आणि कंत्राटदार कंपनीने मिळून शेकडो कोटींचा घोटाळा केला असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी विशेष तपास पथक गठित करून चौकशी करावी. फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार करणे यासाठी फौजदारी गुन्हे नोंदवावेत. संबंधित कंपनीचे टेंडर तत्काळ रद्द करून तिला ब्लॅकलिस्ट करावे.
- विद्यानंद खरात, सामाजिक कार्यकर्ते

या प्रकरणाची तक्रार उपायुक्तांनी माझ्याकडे पाठवली आहे. ही तक्रार माझ्याकडे आजच आलेली आहे. या प्रकरणात लवकरात लवकर चौकशी सुरू करण्यात येणार असून, योग्य ती कारवाई केली जाईल.
- अजित तावडे, प्रमुख सुरक्षा अधिकारी (महापालिका)
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com