संक्रमण शिबिराच्या सर्वेक्षणात फेस रिडींगचा प्रवेश

संक्रमण शिबिराच्या सर्वेक्षणात फेस रिडींगचा प्रवेश

Published on

संक्रमण शिबिराच्या सर्वेक्षणात फेस रिडिंगचा प्रवेश
तीन हजार जणांचे बोटांचे ठसे उमटेनात; दुबार माहिती गोळा करणार; दीड हजार जणांची घरे नेहमीच कुलूपबंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाची वेगवगेळ्या ठिकाणी २० हजार संक्रमण सदनिका असून, त्यामध्ये वास्तव्यास असलेल्यांचे म्हाडाकडून बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जात आहे. सदरचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असले तरी जवळपास तीन हजार रहिवाशांचे बोटाचे ठसे (बायोमेट्रिक) उमटत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधितांचे सर्वेक्षण करण्यासाठी म्हाडा आता फेस रिडिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. पुढील आठावडाभरात सदरचे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे घुसखोरांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबई शहरात १९ व्या शतकात उभारलेल्या १९ हजारांहून अधिक उपकर प्राप्त इमारती असून, त्या अतिधोकादायक झाल्यानंतर येथील रहिवाशींची म्हाडाकडून तात्पुरती सोय म्हणून संक्रमण शिबिरात व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी म्हाडाची शहर आणि उपनगरात ३७ ठिकाणी संक्रमण शिबिरे असून, त्यामध्ये तब्बल २० हजार संक्रमण सदनिका आहेत. मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतीच्या ठिकाणी पुनर्रचित इमारत उभी राहिल्यानंतर संक्रमण शिबिरातील रहिवाशांना स्थलांतरित केले जाते. त्यामुळे रिकाम्या होणाऱ्या संक्रमण सदनिकेत घुसखोरी होते, अनेकजण त्याची परस्पर विक्री करतात. त्यामुळे कोणता संक्रमण गाळा कोणाला दिला आहे, सध्या त्यामध्ये कोण राहते याता आढावा घेण्यासाठी गेल्या सहा-आठ महिन्यांपासून संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जात आहे. सदरच्या सर्वेक्षणादरम्यान जवळपास तीन हजार रहिवाशांच्या बोटाचे ठसे उमटत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांची माहिती संकलित करण्यासाठी आणि बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी संबंधितांच्या बोटांच्या ठशांऐवजी फेस रिडिंगद्वारे दुबार सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दीड हजार घरे नेहमीच कुलूपबंद, घुसखोर असण्याचा संशय
म्हाडाकडून केल्या जात असलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाबाबत सर्व संक्रमण शिबिरातील रहिवाशांना माहिती दिली जात आहे. त्यांनी सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असेही सातत्याने आव्हान केले जात आहे. तरीही जवळपास १,५०० घरे सातत्याने कुलूपबंद असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वेक्षण होऊ शकलेले नाही किंवा त्यांच्याकडून त्याबाबत कोणाताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सदर संक्रमण सदिनिकेत घुसखोर वास्तव्यास असण्याची शक्यता असल्याचा संशय म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केला.

आठवडाभरात संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण होणार
संक्रमण शिबिरात कोण वास्तव्यास आहे, सदरचा गाळा कोणाला देण्यात आला होता, त्याची ओळख पटवण्याबरोबरच संपूर्ण डेटा तयार करण्यासाठी सुरू केलेले सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले असून, १७ हजार जणांचे पूर्ण झाले आहे. उर्वरित रहिवाशांचे १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.

तीन गटांत वर्गवारी होणार
म्हाडाकडून सुरू असलेले सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध माहितीच्या आधारे रहिवाशांचे अ, ब आणि क या तीन गटांत वर्गवारी केली जाणार आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या घुसखोरांवर कारवाई करणे म्हाडाला शक्य होणार आहे.
अ - म्हाडाने अधिकृतपणे संक्रमण सदनिका वितरित केलेला रहिवासी
ब - अधिकृत गाळा वितरित केलेल्या रहिवाशाकडून सदरचा गाळा खरेदी केलेला रहिवासी
क - म्हाडाने अधिकृतपणे गाळ्याचे वितरण केलेले नसतानाही बेकायदेशीरपणे ताबा घेत वास्तव्य करणारा रहिवासी

- एकूण संक्रमण शिबिरे - ३७
- एकूण संक्रमण सदिनिका - २० हजारहून अधिक
- सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सदनिका - १७ हजार
- बोटांचे ठसे न उमटलेले रहिवासी - तीन हजार
- बंद असल्याने सर्वेक्षण न झालेले - १,५००
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com