पाच रुग्णालयांत नवे डायलिसिस केंद्र
पाच रुग्णालयांत नवे डायलिसिस केंद्र
पीपीपी पद्धतीवर होणार कार्यान्वित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : सध्या मूत्रपिंडाच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, डायलिसिस केंद्रांची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन महापालिकेकडून उपनगरातील पाच रुग्णालयांत नवी डायलिसिस केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ती सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीवर चालवली जाणार आहेत.
आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित कर्मचारी आणि वेळेत उपचार या सुविधा रुग्णांना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शताब्दी (कांदिवली) येथे सात, भगवती (बोरिवली-पश्चिम) येथे तीन ते चार, क्रांती सावित्रीबाई फुले (बोरिवली-पूर्व) येथे चार ते पाच, राजावाडी (घाटकोपर) येथे सहा आणि एम. टी. अग्रवाल (मुलुंड) येथे सात ते आठ खाटांची सोय करण्यात येणार आहे. या केंद्रांत अत्याधुनिक डायलिसिस मशीन, पाण्याची शुद्धीकरण यंत्रणा, स्वच्छ व हवेशीर कक्ष तसेच प्रशिक्षित तंत्रज्ञ यांची नेमणूक होणार आहे.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना किंवा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नाव असलेल्या महापालिकेच्या रुग्णांना ही सेवा मोफत मिळेल, तर या योजनांमध्ये नाव नसलेल्यांकडून केवळ ५०० रुपये प्रति सत्र आकारले जाणार आहेत. ही सुविधा केवळ मुंबई व मुंबई महानगर प्रदेशातील पिवळी व केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी उपलब्ध राहील.
किडनीचे कार्य बंद पडल्याने काही रुग्णांना तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस घ्यावे लागते. यामुळे होणारा आर्थिक बोजा आणि वेळेची अडचण यामुळे डायलिसीस उपचारापासून वंचित राहू शकतात. वाढती डायलिसिसची गरज लक्षात घेऊन मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी महापालिकेची डायलिसिस केंद्र वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, याचा नक्कीच फायदा रुग्णांना होईल.