लालबागच्या राजांच्या मूर्तींना यंदा विशेष पसंती

लालबागच्या राजांच्या मूर्तींना यंदा विशेष पसंती

Published on

लालबागच्या राजाच्या मूर्तींना यंदा विशेष पसंती
मातीसह पीओपी मूर्तींनाही मागणी; दरात १० ते २० टक्‍के वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजांच्या मूर्तींना विशेष पसंती मिळताना दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या राजांच्या प्रतिकृतींना नागरिकांचा ओढा अधिक असून, विविध आकार व शैलीतील अशा मूर्तींची मागणी झपाट्याने वाढली आहे. पीओपीसह मातीच्या मूर्ती घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढला असून, त्याचा परिणाम मूर्तींच्या दरांवरही दिसून येतोय.

गणेश मूर्तिकार कामगार संघटनेच्या माहितीनुसार, यंदा मूर्तींच्या दरात १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेषतः ‘राजा स्टाइल’ मूर्तींची मागणी अधिक असून, अनेक गणेशभक्त लालबागच्या राजाच्या मूर्तीप्रमाणेच आपल्या घरी किंवा मंडपात गणपती बसवण्यास उत्सुक आहेत.
दरम्यान, पीओपी मूर्तींवर यंदा मोठा वाद निर्माण झाला असतानाच अखेर शासनाकडून काही अटींसह पीओपी मूर्ती वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पीओपी मूर्तींची खरेदी पुन्हा सुरू झाली असून, बाजारात त्यालाही चांगली मागणी आहे. मात्र यंदा परवानगी उशिरा मिळाल्याने मूर्ती तयार करण्याच्या कामात काहीसा विलंब झाला आहे. त्यामुळे मूर्तिकारांची चांगलीच धावपळ सुरू असून, रात्रीचा दिवस करून ते मूर्ती तयार करण्यात गुंतले आहेत. कमीत कमी वेळात अधिक मूर्ती तयार करण्यासाठी त्यांची कला पणाला लागली आहे.
मुंबईसह राज्यभरात २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मूर्ती, सजावट, आभूषण, फुलं आणि विमा क्षेत्रातही मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, लालबागच्या राजाची क्रेझ, मूर्तिकारांची मेहनत आणि श्रद्धेने भरलेली बाजारपेठ, गणेशोत्सवाच्या रंगतदार सुरुवातीचे संकेत देत आहे.


१२ हजार कोटींचा व्यवसाय
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या अंदाजानुसार, राज्यात यंदा सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होईल. सात लाखांहून अधिक मंडप उभारले जातील, तर मोठ्या मंडपांचे कोट्यवधी रुपयांचे विमेही काढण्यात येत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com