वाहतूककोंडीवर विरूद्ध दिशेच्या मार्गिकेचा अवलंब
वाहतूक कोंडीवर विरुद्ध दिशेच्या मार्गिकेचा अवलंब
पूर्व द्रुतगती मार्गांवर वाहतूक पोलिसांचा उपाय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः पूर्व द्रुतगती महामार्गावरील सकाळी आणि सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत सामान्य दिशेच्या विरुद्ध दिशेने मार्गिका (रिव्हर्स लेन) सुरू केली जाणार आहे.
कांजूरमार्ग वाहतूक विभागाच्या हद्दीत सकाळच्या गर्दीच्या वेळी ठाणे आणि इतर उपनगरांमधून मोठ्या संख्येने वाहने दक्षिण मुंबईकडे जातात. तसेच जवळजवळ तेवढीच वाहने विक्रोळी ते पवई आणि जोगेश्वरी यांना जोडणाऱ्या जेव्हीएलआर रस्त्यावरून जातात. यामुळे दररोज वाहतूक कोंडी दिसून येते, म्हणूनच पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भांडुप पाच खड्डा येथे रिव्हर्स लेन सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, दक्षिणेकडे जाणाऱ्या या मार्गिकेचा वापर सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत वाहतूक कोंडीनुसार करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
असा असेल मार्ग
भांडुप पाच खड्ड्याकडे (भांडुप गाव बसथांब्यापासून ३०० मीटर पुढे दक्षिण दिशेने जाणारी) जाणारी वाहतूक कांजूर गाव, जेव्हीएलआर पूल आणि नंतर पूर्वेकडे जाणारी एक्स्प्रेस वेमार्गे दुभाजकाजवळील उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून वळवली जाईल.