मध्य रेल्वेचा ‘कागदी वक्तशीरपणा’
मध्य रेल्वेचा ‘कागदी वक्तशीरपणा’
टक्केवारीत सुधारणा दाखवून रेल्वे खूश; प्रवाशांना उशीर, बिघाड आणि रद्दबातल गाड्यांचा त्रास कायम
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा कणा असलेल्या उपनगरी लोकल सेवेला मध्य रेल्वेने वक्तशीरपणाचा नवा वेग दिल्याचा दावा केला आहे. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत गाड्यांचा वक्तशीरपणा तब्बल ९३.७७ टक्क्यांवर पोहोचल्याचे आकडेवारीत नोंदवले गेले आहे. गेल्यावर्षी याच आठवड्यात हा टक्का ९२.१३ होता. म्हणजेच १.६४ टक्क्यांची सुधारणा झाली आहे; मात्र ही सुधारणा आकड्यापुरतीच आहे की प्रत्यक्ष प्रवाशांच्या अनुभवातही जाणवते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कागदावर वाढ, प्रत्यक्षात विलंबच
रेल्वे प्रशासनाने आकडेवारी दाखवून समाधान व्यक्त केले असले तरी प्रवाशांची कथा वेगळीच आहे. अनपेक्षित सिग्नल यंत्रणेत बिघाड, इंजिनमध्ये बिघाड, तांत्रिक अडथळे, अचानक रद्द होणाऱ्या सेवा या समस्या गेल्या काही महिन्यांत वारंवार घडल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. काही मिनिटांचा उशीर मुंबईसारख्या शहरात एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण दिवसाचे गणित बिघडवतो. रेल्वे कागदावर वेळेत पोहोचल्याचे दाखवत असली तरी प्रवाशांचा ‘वास्तविक वेळ प्रवास’ अनुभव अजूनही समाधानकारक नाही.
सुधारणा कुठे झाली, कुठे अडचण कायम?
रेल्वेच्या आकडेवारीनुसार, सकाळी गर्दीच्या वेळी वक्तशीरपणा ९१.५५ टक्क्यांवर पोहोचला आहे; पण सकाळी आठ ते दहा या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत गाड्या पाच-दहा मिनिटांनी उशिरा येणे हे सर्रास दिसते. या काही मिनिटांच्या उशिरामुळे प्रवासी कार्यालयात किंवा शाळा-महाविद्यालयात उशिरा पोहोचतात. संध्याकाळी गर्दीच्या वेळी ९२.५९ टक्क्यांची सुधारणा झाल्याचे आकडे सांगतात. तरीही कार्यालय सुटण्याच्या गर्दीत लोकल वेळेत न मिळाल्यास दारात चेंगराचेंगरी, प्लॅटफॉर्मवर अडथळे आणि प्रवासाची कोंडी वाढतेच.
प्रवाशांच्या तक्रारी आणि रेल्वेचे दावे
रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे, की रुळांची तपासणी, ओव्हरहेड वायर देखभाल, लोकोमोटिव्ह दुरुस्ती, आधुनिक सिग्नल प्रणाली आणि प्रवाशांमध्ये जनजागृती अशा अनेक उपाययोजनांमुळे वक्तशीरपणात सुधारणा झाली आहे; मात्र प्रवासी संघटनांचा दावा आहे, की रेल्वे प्रशासन आकडेवारी दाखवण्यात जास्त व्यस्त आहे; प्रत्यक्ष सेवेतल्या त्रुटी दुरुस्त करण्यात रेल्वे कमी पडली, असा आरोप होत आहे. सर्वसाधारण प्रवाशांचा अनुभव असा आहे, की रेल्वे वेळेवर आली तरी गर्दीमुळे चढता न येणे, साखळी खेचल्यामुळे अचानक गाडी थांबणे किंवा छोट्या बिघाडामुळे प्रवास अडकणे या समस्या कायम आहेत. अशा परिस्थितीत फक्त आकडेवारी पुरवून रेल्वे प्रशासन स्वतःला यशस्वी समजत असेल, तर ते प्रवाशांच्या वेदनेशी अन्यायकारक ठरेल.
मुंबईकरांसाठी खरोखर दिलासा की फक्त आश्वासन?
मुंबईतील लोकल सेवा ही केवळ प्रवासाची सोय नाही, तर शहराची खरी ‘लाइफलाइन’ आहे. दररोज लाखो प्रवासी वेळेवर गाडी मिळेल, या आशेवर स्थानकात येतात. काही मिनिटांचा विलंब जरी झाला, तरी त्यांच्या नोकरी, व्यवसाय, शाळा-महाविद्यालयातील शिस्त बिघडते. त्यामुळे रेल्वेचा वक्तशीरपणा टक्केवारीत वाढला असला तरी तो मुंबईकरांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने दिलासा आणू शकला आहे का, असा प्रश्न तज्ज्ञ उपस्थित करतात.
कागदी आकडेवारीत रेल्वेची कामगिरी चमकदार दिसत असली तरी प्रवाशांच्या दृष्टीने अजूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. गर्दी, चेंगराचेंगरी, अचानक बिघाड आणि रद्द होणाऱ्या सेवांच्या समस्या सुटल्याशिवाय रेल्वेचा खरा वक्तशीरपणा केवळ आकडेवारीपुरताच मर्यादित राहील, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
वातानुकूलित केबिनमध्ये बसून लोकलचा वक्तशीरपणा सुधारल्याची आकडेवारी कागदावर मांडणे म्हणजे प्रवाशांच्या वेदनांपासून डोळेझाक करणे होय. रेल्वे अधिकाऱ्यांनी कर्जत-कसारा मार्गावरील गर्दीच्या वेळेत एकदा तरी प्रत्यक्ष लोकल प्रवास करून पाहावा. तेव्हाच खरा अनुभव येईल आणि वक्तशीरपणाची खरी कसोटी कळेल.
- लता अरगडे,
अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ
दररोज सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत गाड्यांचा विलंब हा मुंबईकरांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय आहे. काही टक्क्यांची सुधारणा आकडेवारीत दिसते; पण प्रत्यक्षात प्रवाशांना फारसा दिलासा मिळालेला नाही. सिग्नल यंत्रणेत बिघाड आणि अनपेक्षित रद्दबातल सेवा यामुळे लोकांचा विश्वास अजूनही डळमळीत आहे. रेल्वेने कागदी वक्तशीरपणा दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष सेवेत सुधारणा करण्यावर भर द्यायला हवा.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा
१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५
एकूण - ९३.७७% (२०२४ - ९२.१३%)
सकाळची गर्दीची वेळ - ९१.५५% (२०२४ - ९०.७०%)
संध्याकाळची गर्दीची वेळ - ९२.५९% (२०२४ - ९०.८३%)
जुलै २०२५
एकूण - ९२.१९% (२०२४ - ९१.२५%)
सकाळ गर्दीची वेळ : ८९.९०% (२०२४ - ८९.४९%)
संध्याकाळ गर्दीची वेळ : ९२.०४% (२०२४ - ९१.०२%)
१ एप्रिल - ७ ऑगस्ट २०२५
एकूण - ९२.९९% (२०२४ - ९२.०८%)
सकाळ गर्दीची वेळ - ९०.८७% (२०२४ - ८९.१४%)
संध्याकाळ गर्दीची वेळ - ९२.९५% (२०२४ - ९१.०१)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.