मैत्री करून खंडणीची मागणी

मैत्री करून खंडणीची मागणी

Published on

मैत्री करून खंडणीची मागणी
डॉक्‍टरची ९४ लाखांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : वडाळा येथील एका ३५ वर्षीय ऑर्थोपेडिक डॉक्टरशी इन्स्टाग्रामवर मैत्री करून लैंगिकदृष्ट्या संवेदनशील सामग्रीच्या आधारावर धमकावून तब्बल ९४.४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सौम्या मनदीपसिंग अवस्थी या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट ओळख तयार करणारी महिला आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात मध्य विभाग सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार डॉक्टर परळ येथील रुग्णालयामध्ये अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी स्पॅम सोफियाज या इन्स्टाग्राम आयडीवरून सौम्या नावाच्या महिलेकडून त्यांना मैत्रीची विनंती आली. सौम्याने स्वतःला चंदीगडच्या वैद्यकीय महाविद्यालयामधील एमबीबीएसची विद्यार्थिनी असल्याचे सांगितले. ती लहानपणापासून एकटी राहत असून, मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे भासवत डॉक्टरशी मैत्री वाढवली. काही दिवसांतच अश्लील संभाषण आणि नग्न फोटो शेअर करण्यास सुरुवात झाली.
२ मे रोजी तिने डॉक्टरला सांगितले की, तिचे व्हॉट्सॲप चॅट थायलंडमधील पेगासस नावाच्या हॅकरने हॅक केले असून, तो ३.१० बिटकॉइन (अंदाजे २.५ कोटी रुपये) खंडणी म्हणून मागत आहे. पैसे न दिल्यास अश्लील फोटो आणि चॅट व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे नमूद केले. त्याच दिवशी सौम्याने एक ड्राफ्ट तयार करून तक्रारदार यांना पाठवत त्यांच्या रुग्‍ग्‍णालय आणि वैद्यकीय परिषदेला मेल करून ते तिचे शोषण करत असल्याचे कळवेल. तसेच तिच्याकडे असलेले अश्लील फोटो व व्हिडिओ क्लिप पाठविण्याची धमकी दिली.
डॉक्टरने भीतीपोटी तिच्या सांगण्यानुसार एकूण ९४.४७ लाख रुपये विविध खात्यांमध्ये पाठवले. दरम्यान, बँक तपशीलात जस्मिन कौर असे नाव दिसल्याने डॉक्टरला संशय आला. फसवणुकीची जाणीव होताच डॉक्टरने सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांच्या पत्नीला अनोळखी नंबरवरून धमकीही देण्यात आली. डॉक्टरने पोलिसांना संभाषणाचे फोटो सादर केले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com