गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज

गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज

Published on

गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज
१० हजार कर्मचारी, २९० कृत्रिम तलावांची व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : अनंत चतुर्दशीदिनी शनिवारी (ता. ६) होणाऱ्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने संपूर्ण तयारी केली असून, गणरायाला निरोप देण्यासाठी विविध सोयी-सुविधांसह प्रशासन सज्ज आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी महापालिकेचे जवळपास १० हजार अधिकारी-कर्मचारी, २४५ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत.
यंदा श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी ७० नैसर्गिक स्थळांसह सुमारे २९० कृत्रिम विसर्जन स्थळांवर व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक भाविक तसेच सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये श्रीगणेश मूर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासंबंधित पूर्वतयारीबाबत उपआयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी सांगितले, की मुंबईतील श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून यंदाही अधिकाधिक सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. घरगुती तसेच सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. विसर्जनासाठी येणारी वाहने किनाऱ्यांवरील वाळूमध्ये अडकू नयेत, मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी विविध ठिकाणच्या चौपाट्यांच्या किनाऱ्यांवर एक हजार १७५ स्टील प्लेट, छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ६६ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन हजार १७८ जीवरक्षकांसह ५६ मोटर बोटी तैनात केल्या आहेत. निर्माल्य संकलित करण्यासाठी ५९४ निर्माल्य कलशांसह ३०७ निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेच्या विविध खात्यांतील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर २४५ नियंत्रण कक्ष आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने १२९ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विसर्जनस्थळावर ४२ क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विविध ठिकाणी २८७ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत.
विसर्जनस्थळी येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाकडून २३६ प्रथमोपचार केंद्रांसह ११५ रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विसर्जनस्थळी प्रकाशयोजनेसाठी सुमारे सहा हजार १८८ प्रकाशझोत दिवे आणि शोधकार्यासाठी १३८ दिवे लावले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी १९७ तात्पुरती शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहित प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

क्यूआर कोड स्कॅन करून घ्या कृत्रिम तलावांची माहिती
मुंबईत पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी महापालिकेने यंदा सुमारे २९० कृत्रिम तलाव तयार केले आहेत. महापालिका संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/HomePage%20Data/Whats%20New/ganpati_art_ponds.pdf या लिंकवर कृत्रिम तलावांची यादी उपलब्ध आहे. या यादीमध्ये संबंधित कृत्रिम तलावांची गुगल मॅप लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच क्यूआर कोड स्कॅन करून किंवा बीएमसी व्हॉटसॲप चॅटबॉट ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावरूनही कृत्रिम तलावांसंबंधित माहिती जाणून घेता येईल.

नागरिकांना पावित्र्य जपण्याचे आवाहन
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या तसेच विसर्जनस्थळी जबाबदारीने आणि सतर्कतेने वागावे. महापालिका आणि मुंबई पोलिस दलाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मत्स्यदंशापासून बचाव करा!
ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ब्लू बटण जेलीफिश, स्टिंग रे प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच १०८ रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली आहे.

भरती, ओहोटीकडे द्या लक्ष
यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी समुद्रात सकाळी ११.०९ वाजता ४.२० मीटरची भरती, सायंकाळी ५.१३ वाजता १.४१ मीटरची ओहोटी तसेच रात्री ११.१७ वाजता ३.८७ मीटर उंचीची भरती असेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ७ सप्टेंबरला पहाटे ५.०६ मिनिटांनी ०.६९ मीटरची ओहोटी, सकाळी ११.४० वाजता ४.४२ मीटरची भरती असेल. विसर्जनासाठी समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या नागरिकांनी भरती व ओहोटीदरम्यान सतर्क राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

भाविकांनी घ्यावयाची काळजी
भाविकांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये, पालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी, काळोख असणाऱ्या ठिकाणी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाकरिता जाणे टाळावे, महापालिकेने पोहण्याकरिता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये, समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे, कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com