आयुर्वेदाच्या ज्येष्ठ अभ्यासिका शुभदा अरविंद पटवर्धन  यांचे निधन

आयुर्वेदाच्या ज्येष्ठ अभ्यासिका शुभदा अरविंद पटवर्धन यांचे निधन

Published on

आयुर्वेदाच्या ज्येष्ठ अभ्यासिका शुभदा पटवर्धन यांचे निधन

मुंबई, ता. ५ : आयुर्वेदाच्या ज्येष्ठ अभ्यासिका शुभदा अरविंद पटवर्धन (वय ७८) यांचे शुक्रवारी (ता. ५) मूत्रपिंडाच्या आजाराने माहीम येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मोठे बंधू आयुर्वेदाचार्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांच्या धाकट्या कन्या होत. त्यांच्या पश्चात पती, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

शुभदा यांनी वडिलांचा वारसा पुढे नेत त्यांनी मुंबईमध्ये आपले पदवीपर्यंत आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण केले; त्यानंतर जामनगरहून १९७२ साली आयुर्वेदशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली. १९७३ साली विवाहानंतर त्यांना आपल्या वडिलांसमवेत आयुर्वेद वैद्यकीय व्यवसाय करण्याचा प्रदीर्घ अनुभव मिळाला. शुभदा यांनी गेली पन्नास वर्षे घर्षण या आयुर्वेदीय चिकित्सेचा उपयोग करून रुग्णांच्या गंभीर व्याधींवर उपचार केले. त्यांनी अमेरिकेतही आयुर्वेदावर व्याख्याने देऊन स्थौल्य व सोरायसिस या व्याधींच्या रुग्णावर चिकित्सा व उपचार केले. ते मुंबईच्या पुनर्वसु आयुर्वेद महाविद्यालयात व्याख्याता, तर मित्तल आयुर्वेद महाविद्यालयातील सुप्रजा केंद्रात आयुर्वेदिक विशेष सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांनी मराठी विश्वकोश, मराठी विज्ञान परिषद व आयुर्वेदीय पत्रिकेत विपुल लेखन केले. त्यांचे आयुर्वेद -अमृतकुंभ (१९९६), आरोग्य संपन्न जीवनकरिता आयुर्वेद (२०११), आयुर्वेदाच्या दृष्टिकोणातून आरोग्यसंपन्न संतती (२०१३), आयुर्वेदाचे भाष्यकार वेणीमाधवशास्त्री जोशी (२०१७) आदी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांना वैद्य खडीवाले यांच्या संशोधन संस्थेने २०१३चा ‘महर्षि’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांनी ‘घर्षण’ या नावाने अनुभवकथनाचे लेखनही केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com