मुंबईकर सर्दी-खोकल्याने हैराण

मुंबईकर सर्दी-खोकल्याने हैराण

Published on

मुंबईकर सर्दी-खोकला, तापाने हैराण
रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली

मुंबई, ता. ९ : बदलत्या हवामानाने मुंबईकर हैराण झाले आहेत. पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने अचानक वातावरणात उकाडा वाढला आहे. त्यामुळे मुंबईत व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, शिवाय रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
साधा खोकला आणि सर्दीही आठवडाभराहून जास्त काळ टिकत असल्याने नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागत आहे. घसादुखी, अंगदुखी, श्वसनाचा त्रास या लक्षणांमुळे रुग्णालये, खासगी क्लिनिक आणि पालिकेच्या दवाखान्यातही गर्दी वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईत पारा सतत वरखाली होत असून, ढगाळ वातावरण, मध्येच पडणारा पाऊस आणि दमट हवामान यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे.

एफ दक्षिण येथील आपला दवाखान्यात जवळपास ५० टक्के रुग्ण हे सर्दी, ताप आणि खोकल्याचे दाखल होत आहेत. या आजाराची लक्षणे किमान आठ दिवस जात नसल्याचेही रुग्ण सांगतात. शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी दवाखान्यांतही व्हायरल ताप, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची गर्दी दिसून येते. खासगी रुग्णालयांत दररोज ३० ते ४० तापाचे आणि ५० ते ६० खोकला-सर्दीचे रुग्ण येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दूषित अन्नपदार्थ खाणे किंवा दूषित पाणी पिल्याने संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे आणि उघड्यावरचे पाणी पिणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. घरात कूलर किंवा एसीचा वापर टाळावा, घराभोवती पाणी साचू देऊ नये आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. लहान मुले, वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेले रुग्ण यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉक्टरांनी नागरिकांना जास्त ताप आल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे सांगितले आहे. शरीर दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे असल्यास प्लेटलेट्स तपासून घ्यावेत, कारण या लक्षणांचा डेंगी आणि इतर आजारांशी गल्लत होऊ शकते.

प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन गरजेचे
मुंबईतील बदलत्या हवामानाने निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करणे, पुरेशी झोप घेणे, घरगुती आहारावर भर देणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सूचवले आहे. योग्य काळजी घेतल्यास या व्हायरलवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
तीन ते चार दिवसांत हा व्हायरल ताप जाणे गरजेचे आहे, मात्र सध्या आठवडाभर सर्दी-खोकला जात नाही. त्यामुळे लक्षणे दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे, असे केईएम रुग्णालयातील एका डॉक्टरांनी सांगितले.
...
मुंबईत सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये सध्या सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही साथ साध्या औषधोपचाराने बरी होऊ शकते, परंतु औषधे मध्येच थांबवू नयेत. लक्षणे कमी झाली तरी उपचार पूर्ण करणे गरजेचे आहे.
डॉ. मधुकर गायकवाड, मेडिसिन विभाग प्रमुख, जे. जे. रुग्णालय.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com