रेल्वेची मालमत्ता व्यावसायिक वापरासाठी सज्ज
रेल्वेच्या मोक्याच्या जागा व्यावसायिक वापरासाठी
महालक्ष्मी, वांद्रे येथील जमिनी ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर
मुंबई, ता. ९ : महसूल वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने मुंबईतील मोक्याच्या जागा व्यावसायिक वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) महालक्ष्मी येथील भूखंड भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत, तर वांद्रे पूर्वेतील १०.६ एकरच्या प्रचंड भूखंडासाठी या आठवड्याच्या अखेरीस प्रस्ताव मागवले जाणार आहेत. या दोन प्रकल्पांमधून तब्बल सहा हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा रेल्वेचा अंदाज आहे.
महालक्ष्मी येथील २.६७ एकरचा भूखंड हा या व्यवसायिकरणाच्या प्रकल्पाचा मुख्य भाग ठरणार आहे. महालक्ष्मी रेल्वेस्थानकापासून फक्त ४०० मीटर अंतरावर असलेल्या या भूखंडाला लागून मेट्रो, मोनोरेल आणि विज्ञान संग्रहालय आहे. नरीमन पॉइंट, लोअर परेल आणि बीकेसीसारख्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांशी हा भाग जोडलेला आहे. त्यामुळे या भूखंडाला मोठी मागणी आहे. ८ ऑगस्टला या भूखंडासाठी निविदा काढण्यात आली आहे. याची आधारभूत किंमत ९९३.३० कोटी रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. बोली लावण्यासाठी १४ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. या भूखंडावर ५० मजली लक्झरी ऑफिसेस आणि निवासी टॉवर उभारण्यात येतील. या जमिनीचा एफएसआय ४.०५ असून, कंत्राटदाराला महसुलातील किमान ३५ टक्के हिस्सा आरएलडीएला द्यावा लागणार आहे.
दरम्यान, वांद्रे पूर्वेतील तब्बल १०.६ एकर जमीनही बाजारात आणली जाणार आहे. वांद्रे स्थानकाला लागून असलेला या भूखंडावर गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण होते. आता त्यावरील अडथळे दूर करून त्यासाठी निविदा मागवण्याची तयारी सुरू आहे. या भूखंडाला ९९ वर्षांची लीज देऊन तब्बल पाच हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा रेल्वेला आहे. बीकेसी जवळ असल्याने ही जमीन प्रीमियम ऑफिसेस, लक्झरी हाउजिंग आणि उंच टॉवर प्रकल्पांसाठी आकर्षण ठरणार आहे.
मिळणारा निधी स्थानकांच्या पुनर्विकासासाठी वापरणार
रेल्वेला मिळणारा हा निधी स्थानकांवरील सुविधा वाढवणे, नवीन कोचनिर्मिती, तसेच स्थानक पुनर्विकासासाठी वापरण्यात येणार आहे. मुंबईसारख्या महानगरात अशा जमिनी बाजारात आणल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी हालचाल होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
---
ग्राफिक्स :
- महालक्ष्मी भूखंड
२.६७ एकर, डॉ. ई. मोझेस रोडलगत
बेस प्राईस : ९९३ कोटी
एफएसआय : ४.०५
५० मजली टॉवरची शक्यता
१४ ऑक्टोबर : बोलीची अंतिम तारीख
..
- वांद्रे (पूर्व) भूखंड
१०.६ एकर, वांद्रे स्थानकाजवळ.
अपेक्षित महसूल : ५,००० कोटी.
अतिक्रमणमुक्तीनंतर विकसनाला गती.
बीकेसीजवळ, लक्झरी ऑफिस व टॉवर प्रकल्पांसाठी योग्य.
....
रेल्वेच्या जमिनींचा व्यापारी वापर
- परळ, महालक्ष्मी, वांद्रे (पूर्व), वांद्रे (पश्चिम) परिसरातील प्रमुख भूखंडांवर नजर
- निविदांमधून हजारो कोटींचा महसूल अपेक्षित.
- लक्झरी रिअल इस्टेट व ग्रेड-ए ऑफिसेससाठी मोठी मागणी.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.