लष्करी शस्त्रसाठा चोरणाऱ्यांच्या शोधासाठी २० पथके

लष्करी शस्त्रसाठा चोरणाऱ्यांच्या शोधासाठी २० पथके

Published on

लष्करी शस्त्रसाठा चोरट्यांच्या शोधासाठी २० पथके
मुंबई महाराष्ट्रासह अन्य राज्यांत पथके रवाना

मुंबई, ता. ९ : पश्चिम नौदल कमांड मुख्यालय आवारातील वसाहतीतून रायफल आणि ४० जिवंत काडतुसे चोरणाऱ्या दोन आरोपींचा शोध पोलिसांच्या २० हून अधिक पथकांकडून सुरू आहे. त्यासाठी मुंबई महाराष्ट्रासह अन्य राज्यांत पथके रवाना करण्यात आली आहेत.
शनिवारी (ता. ६) रात्री आठच्या सुमारास ही चोरी घडली होती. याप्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.
शस्त्रसाठा चोरणाऱ्या दोघांचा ओळख पटविण्यासाठी स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेने परिसरातील २०० हून अधिक सीसीटीव्हींचे चित्रण तपासले. त्यावरून आरोपींनी आसपासच्या सीसीटीव्हीत चेहरा दिसू नये, याची काळजी घेतल्याचे स्पष्ट झाले. शिवाय चोरी घडली तेव्हा नौदल मुख्यालय परिसरात विसर्जन मिरवणुकांची धूम सुरू होती. रात्रीची वेळ, अधूनमधून येणारा पाऊस, फटाक्यांचा धूर आणि गर्दी यामुळे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांच्या फारसे उपयोगी पडेल, याबाबत शंका होती; मात्र यातील एका सीसीटीव्हीत आरोपी आणि त्यांची कृती कैद झाली असून त्या आधारे कुलाबा, कफ परेड येथील नागरी वस्त्यांमध्ये या दोघांची ओळख पटविण्यासाठी पोलिस धडपड करीत आहेत.
गुन्हे शाखेची १०, स्थानिक पोलिसांची आठ तर दहशतवादविरोधी पथकाची चार पथके शस्त्रसाठा चोरांच्या मागावर आहेत. यातील काही पथके मुंबई, महाराष्ट्रात असून काही परराज्यांत रवाना झाल्याचे सूत्रांकडून समजते.


शस्त्र एकाने फेकली, दुसऱ्याने उचलली
पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही चित्रणावरून आरोपीने शस्त्रसाठा गोणीत भरून संरक्षक भिंतीपलीकडे फेकला. तर भिंतीपलीकडे दबा धरून बसलेल्या त्याच्या साथीदाराने तो उचलून धूम ठोकली. काही वेळाने शस्त्रसाठा फेकणारा आरोपी तेथून बाहेर पडला, असे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com